रायगडला पाणी टंचाईच्या झळा

अलिबाग : रायगड माझा 

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पाणी टंचाई सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या रायगडकरांना पाणी टंचाईच्‍या झळा जाणवू लागल्‍या आहेत. रायगड जिल्‍हा प्रशासनाने जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे म्हटले आहे. या गावांमध्ये २० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.

पेण तालुक्यात सर्वाधिक २१ गावांमध्ये पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात कर्जत, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव या तालुक्यांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई आहे. कर्जत तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्या, पेणमध्ये २१ गावे आणि ६५ वाड्या, रोहा तालुक्यात २ वाड्या, माणगावमध्ये २ वाड्या, महाडमध्ये २ गावे आणि १७ वाड्या पाणी टंचाईच्या छळा सोसत आहेत. तर  पोलादपूर तालुक्यात १० गावे आणि ७१ वाड्या, श्रीवर्धनमधील  ४ वाड्या अशा एकूण ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला होता. त्यात ५०८ गावे आणि १  हजार ३०२ वाड्यांचा समावेश आहे. ८ कोटी ६२ लाख रुपयांचा हा आराखडा आहे. यातून ३१५ गावे आणि ७८५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा अपेक्षित आहे. ७४ गावे आणि २२१ वाड्यांमध्ये विंधनविहिरी खोदण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

झिंक टाक्या बसवणार
रायगड जिल्ह्यात ज्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई भासते तेथे जल स्वराज्य योजनेतून झिंक टाक्या बसवण्यात येणार आहेत. १७५ झिंक टाक्यांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठविण्यात येईल. १०००  लोकसंख्या असलेल्या गावांना ३ महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  होऊ शकेल,  इतके पाणी साठविण्याची क्षमता या टाक्यांची असेल. यात जल शुद्धीकरणाची व्यवस्था असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत