रायगड लोकसभा मतदारसंघः तटकरे, गीतेंपुढे आव्हान गटबाजीचे

चिपळूण: रायगड माझा वृत्त

रायगड लोकसभा मतदारसंघ कधीच लाटेवर स्वार झाला नाही. कधी काँग्रेसला तर कधी शेकापच्या पदरात दान टाकणाऱ्या या मतदारसंघाने मागील निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनंत गीते काठावर विजयी झाले. आगामी निवडणुकीत तटकरे विरुद्ध गीते असाच सामना होईल. परंतु दोन्ही नेत्यांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान आहे. युती झाली नाही तर भाजपकडे डॉ. विनय नातू हे लोकसभेसाठी पर्याय आहेत.

मतदारसंघाचा इतिहास 
2009 च्या पुनर्रचनेआधी कुलाबा नावाने हा मतदार ओळखला जात होता. 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसने मोठे यश मिळवले. परंतु कुलाबा मतदारसंघ त्यावेळी शेकापबरोबर राहिला. 2014 ला देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गीते जेमतेम 2 हजार 110 मतांनी विजयी झाले. 1989 ते 1996 पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी शेकापचे अॅड. दत्ता पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत बॅ. अंतुले पुन्हा खासदार झाले. 2009 आणि 2014 मध्ये अनंत गीते निवडून आले.

अनंत गीतेंची जमेची बाजू 
सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद सांभाळत आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. कुणबी समाजाचा पाठिंब्यावर ते निवडून येतात. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेनेत नाराज आहेत मात्र गीते आणि दळवींचे राजकीय संबंध चांगले आहेत.

आव्हाने 
या मतदारसंघात कुणबी मतांचे प्राबल्य आहे. एरव्ही कुठल्याही पक्षाशी बांधिलकी सांगणारे कुणबी मतदार लोकसभेला मात्र आपला माणूस म्हणून गीतेंच्या पाठीशी उभे राहतात. अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आहे. कोकणात एखादा तरी उद्योग येईल, अशी इथल्या तरुणांची अपेक्षा होती. परंतु शासनाच्या धोरणामुळे ती सपशेल फोल ठरलीय. मंत्री म्हणून अनंत गीते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. नियमित बैठका आणि खासदार निधी संपवण्यापलीकडे त्यांचे काहीच काम दिसत नाही. त्यामुळे शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज आहेत. मतदारसंघाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दहा वर्षात त्या सोडविण्यासाठी गीतेंनी काय केले,असा प्रश्‍न विरोधक विचारत आहेत.

रामदास कदमांची भूमिका महत्त्वाची 
पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि गीते यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोली मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहे. आधी लोकसभा निवडणूक आहे. रामदास कदमांनी गीतेंच्या विरोधी काम केले, तर विधानसभा निवडणुकीत गीतेंकडून त्याची परतफेड होईल. त्यामुळे रामदास कदमांना गीतेंच्या प्रचारात एक कदम पुढेच राहावे लागणार आहे.

सुनील तटकरेंसाठी जमेची बाजू 
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुनील तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठली होती. शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्याविरोधात आघाडीच उघडली होती. तटकरेंचे राष्ट्रवादीतील कट्टर समर्थक चिपळूणचे रमेश कदम यांनाच त्यांच्या विरोधी मैदानात उभे केले होते तरीही तटकरेंनी गीतेंना फेस आणला होता. राष्ट्रवादीला शेकापची साथ मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित असल्याने त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील मोठा अडसर दूर होणार आहे. दापोलीचे आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, मनसेचे वैभव खेडेकर यांची अलिखित आघाडी आहे. त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल.

भास्कर जाधवही इच्छुक 
रायगड लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. कागदावर राष्ट्रवादीची बाजू भक्कम दिसत असली तरी अंतर्गत वाद मोठा आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितल्याने तटकरेंची अडचण वाढली आहे. राष्ट्रवादीत तटकरे विरुद्ध भास्कर जाधव असा वाद आहे. तटकरे विजयी झाले तर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तटकरेंचा हस्तक्षेप वाढेल. तटकरेंच्या नाकाबंदीसाठीच जाधवांनी उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत