‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार

अमृतसर : रायगड माझा वृत्त 

पंजाबातील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ ‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावरही साचली असतानाच या लोहमार्गावरून वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून ६० जण मृत्यूमुखी पडले, तर ५१ जखमी झाले आहेत. या प्रकाराने एकच हलकल्लोळ माजला असून अवघा देश सुन्न झाला आहे.पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. ते शनिवारी सकाळी दुर्घटनास्थळी जाणार आहेत.

Image result for amritsar railway accident

विजयादशमीनिमित्त ‘रावण दहना’चा पारंपरिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम मानावाला आणि फिरोजपूर रेल्वे  स्थानकांदरम्यान लोहमार्गाजवळच्या मोकळ्या जागेत सुरू होता आणि तो पाहण्यासाठी सुमारे ३०० लोकांनी गर्दी केली होती. दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्याच्या पोटातील फटाके जोरात वाजू आणि इतस्तत: उडू लागले. त्यामुळेही बरेच लोक लोहमार्गावर अवचितपणे आल्याचे सांगितले जाते. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली.

विशेष म्हणजे मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे प्रवासी नव्हते, असे सांगत ‘घुसखोर’ म्हणून रेल्वेने त्यांची नोंद केली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून या मृतांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर तीन तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वेमंत्री पियूष गोयल हे अमेरिका दौऱ्यावर असून दौरा थांबवून ते मायदेशी परतत आहेत. रेल्वेची पथकेही तातडीने रवाना झाली आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्री नवज्योत कौर या दहन कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी होत्या. त्या दुर्घटनेनंतर निघून गेल्याचा आरोप भाजपने केला. तर मी दहन आटोपत असतानाच गाडीत बसून निघाले होते. त्यामुळे काय घडले, हे मला आधी माहीतच नव्हते, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली. मृतांच्या नावावर कोणी राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या.

दोन गाडय़ा आल्याने गोंधळ?

रावण दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्याच्या पोटातील फटाके जोरात वाजत उडू लागले. त्यामुळे या पुतळ्याजवळच्या लोकांनी लोहमार्गाकडे धाव घेतली. त्याचवेळी लोहमार्गावरही आधीच शेकडो लोक उभे होते आणि मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात दंग होते. लोहमार्गावर गर्दी झाली असतानाच दोन्ही दिशांनी वेगाने रेल्वेगाडय़ा धडाडत आल्या. त्यामुळे लोक अधिकच भांबावले आणि लोहमार्गावरच खिळल्यागत राहिले आणि एका गाडीच्या धडकेने मृत्युमुखी पडले, असे समजते. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जातील आणि जखमींवर मोफत उपचार होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. तर मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जी दुर्घटना घडली ती अत्यंत क्लेशदायक आहे मी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत