राष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना “नाशिकबंदी’चा इशारा

नाशिक : रायगड माझा वृत्त 

“नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल,” असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाने दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांत दुष्काळाची झळ बसत आहे. अशाही स्थितीत नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या 56 टक्के पाणीसाठा असताना सुद्धा नाशिकच्या हक्काचे सात टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय ? असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांना खूश करण्यासाठी शासनाने अभ्यास न करता हा निर्णय घेतला आहे. त्याची किंमत तहानलेल्या दत्तक नाशिककरांना चुकवावी लागणार आहे.  हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रमुख आक्षेप आहे.

शासनाने नाशिकच्या दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यास करावा व त्यानुसार जनहितार्थ निर्णय घ्यावा. नाशिककरांवर अन्याय करून जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मात्र सोडणार नाही. पालकमंत्र्यांना आम्ही फिरकूच देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत