राष्ट्रवादीच्या उमेदवारावर भाजपची गणिते

BJP

सातारा : रायगड माझा वृत्त

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही. त्यातच शिवसेनेसोबत युतीचे संकेतही स्पष्ट नसल्याने जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सातारा लोकसभेपेक्षा भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना डावलले जाईल आणि आयता उमेदवार मिळेल, या आशेवर भाजपचे नेते होते. पण, आता राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्‍यता दिसत असल्याने भाजपला आता सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. शिवसेनेशी युती होईल किंवा नाही, मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल का, असे अनेक प्रश्‍न असल्याने जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीचा विचार केलेला दिसत नाही. तरीही साताऱ्यातून सक्षम उमेदवार मिळाल्यास ऐनवेळी राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारीही भाजपने ठेवली आहे. सध्या तरी भाजपने लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीवर जास्त भर दिलेला दिसतो.

पुरुषोत्तम जाधव मागे
राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या साताऱ्यात विद्यमान खासदार उदयनराजेंविरोधात भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. मागील काही दिवसांत खंडाळ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. पण, प्रो-कबड्डी स्पर्धेत साताऱ्याच्या संघाची मालकी घेतल्यानंतर त्यांचाही सातारा लोकसभा मतदारसंघातील संपर्क तुटला आहे. ‘संपर्क फॉर समर्थन’च्या माध्यमातून त्यांनी चांगले रान उठविले होते. पण, ही आघाडी आता पुन्हा मागे पडली आहे.

राष्ट्रवादीत अस्वस्थता
दुसरीकडे उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकीट डावलले तर त्यांच्या माध्यमातून सातारा लोकसभा लढण्याची स्वप्ने भाजपचे नेते पाहात होते. राष्ट्रवादीनेही उदयनराजेंबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांतही अस्वस्थता आहे.

भाजपमध्ये धुसफूस
कऱ्हाडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हेही सातारा लोकसभेच्या इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यांनी त्या दृष्टीने पक्षाची बांधणी आणि संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे. पण, भाजपमध्ये जुने व नवे नेते अशी अंतर्गत धुसफूस दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. हा वाद मिटवून सातारा लोकसभेला सर्वसमावेशक, सर्वमान्य उमेदवार देण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पार पाडावी लागणार आहे.

युतीवर सर्व गणिते
भाजपच्या नेत्यांना शिवसेनेसोबत युती होणार का, हा प्रश्‍न सतावत आहे. युती झाली तर सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. मागील वेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यांनी ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली होती. यावेळेसही ही जागा कोणाला जाणार, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. युती झाली नाही तर भाजप उदयनराजेंविरोधात सामान्य उमेदवार देऊन त्या बदल्यात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची मदत घेण्याचीही शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

माढ्यातून दोन देशमुख आमने-सामने?
माढा मतदारसंघात येणारे फलटण, माण आणि खटाव तालुक्‍यांतून भाजपमधून कोणीही इच्छुक नाही. सध्या येथून भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीने यावेळेस चेहरा बदलण्याची भूमिका घेतल्याने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना संधी मिळण्याची शक्‍यता दिसते. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील देशमुखांविरोधात भाजपचे सुभाष देशमुख अशी लढतीची चिन्हे आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत