राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ

छत्रपतीं शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेणार; तर महाडच्या चवदार तळयाच्याठिकाणी पहिली सभा

मुंबई : रायगड माझा वृत्त

सरकारचा भ्रष्टाचार…अनेक गंभीर चूका…आत्तापर्यंत झालेले घोटाळयांचे आरोप…दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश…नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव…घनकचऱ्याचा प्रश्न आणि चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन केलेली लूट…असे अनेक प्रश्न घेवून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन संपर्क यात्रा काढत आहे.

१० जानेवारीपासून सुरु होणारी ही परिवर्तन संपर्क यात्रा जवळपास १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर पहिली सभा सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयाच्याठिकाणी घेतली जाणार आहे.

या परिवर्तन संपर्क यात्रेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह इतर सर्व नेते सहभागी होणार आहेत.

ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करुन देवून जनतेचे सहकार्य घेणार आहे.

कर्जमाफीबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. अक्षरश: बोजवारा उडालेला आहे. कर्जमाफीबाबात शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा उरलेल्या नाही. या सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह जनतेच्या मैदानात आणि दारात जावून राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहेच शिवाय निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका मनात घेवून परिवर्तन संपर्क यात्रा राज्यात वादळ उठवणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत