राष्ट्रवादीच्या “पगडी’ची भाजपला “धास्ती’?

मुख्यमंत्र्यांची नवी खेळी : संत तुकोबांच्या पगडीचा पुरस्कार

पिंपरी :रायगड माझा 

राज्यासह देशातील राजकारणातील जातीय रंग आता गडद होवू लागले आहेत. संत-महात्म्यांना त्या-त्या पक्षाचे विशिष्ट “लेबल’ लावले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी “पुणेरी पगडी’ऐवजी महात्मा फुले यांच्या पगडीचा पुरस्कार केला. त्यावर कुरघोडी म्हणून पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून केला. त्यामुळे पवारांच्या पगडीमुळे भाजपची “धास्ती’ वाढली आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला.

वास्तविक, संत, महात्म्ये यांना कोणत्याही जातीच्या चौकटीत बसवणे व्यवहार्य ठरणार नाही. पण, राजकीय सोयीनुसार त्यांचा सर्रास वापर होताना दिसतो. दि. 10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पुण्यातील सहकारनगर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात सुरूवातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ या दिग्गज नेत्यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार केला. पण, पवारांनी “यापुढे आमचा सत्कार होईल, तर महात्मा फुले यांची पगडी घालूनच’, असे फर्मान काढले. पुन्हा नव्याने फुले पगडी घालून त्यांचा सत्कार झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमात आता महात्मा फुले पगडीचा पुरस्कार होताना दिसतो. भोसरीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सत्कारही फुले पगडी घालूनच करण्यात आला. पवारांच्या अर्थात राष्ट्रवादीच्या भूमिकेवर समाज माध्यमांमधून आरोप-प्रत्यारोप झाले. पगडी बदलण्याचा निर्णय पूर्व नियोजित होता, असा मतप्रवाह पुढे आला.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील शासकीय महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे निदर्शने करण्याचा इशारा दिला. मराठा आरक्षणावरुन पंढरपुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यामुळे फडणवीस यांनी महापुजा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावली. विशेष म्हणजे, याच दिवशी नियोजित विकास कामांच्या उद्‌घाटनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री बापट यांचा सन्मान जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी आणि उपरणे देवून करण्यात आला. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण भाषण हे तुकोबांची पगडी घालूनच केले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवारांना मुख्यमंत्र्यांचा शह

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले पगडीचा आग्रह धरुन राज्यातील बहुजन समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. सध्या राज्यातील भाजप सरकार म्हणजे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे आहे. त्यामुळेच राज्यात बहुजन समाज उपेक्षीत आहे, असे वातावरण निर्माण होवू लागले आहे. भीमा कोरेगाव सारख्या घटनांना सरकारला जबाबदार धरले जात आहे. मराठा मोर्चाची सरकारविरोधी धारही तीव्र होवू लागली आहे. परिणामी, भाजपविरोधी बहुजन पुरस्काराचा विचार राज्यात वाढत असताना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजकीय खेळी केली. पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारखी पगडी आणि उपरणे घेवून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या अजेंड्याला “खो’ घातला आहे. त्याला आषाढी एकादशीचे निमित्त हे केवळ निमित्त होते. हाही सत्कार पूर्वनियोजित होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे आम्हीही वारकरी परंपरेचा आणि बहुजन विचारांचा पुरस्कार करतो, असे समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्याद्वारे राष्ट्रवादीच्या बहुजनवादाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत