राष्ट्रवादीच्या वर्चस्वामुळे सोलापुरात शिवसैनिक नाराज; जिल्हाप्रमुखांनी व्यक्त केली खंत 

महाराष्ट्र News 24 वृत्त

राज्याच्या राजकारणात भाजपला  सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. राज्याच्या राजकारणात चमत्कार घडविणारा हा राजकीय प्रयोग मात्र अद्यापही जिल्हा आणि तालुका पातळीवर रुजला नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा व तालुका पातळीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत शिवसेनेच्या सत्तेचे टायमिंग जुळत नसल्यासमोर येत आहे. . राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दुखणे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पत्राच्या माध्यमातून मांडले आहे. जिल्हाप्रमुखांचीच जर अशी व्यथा असेल तर सामान्य शिवसैनिकांचा विचार न केलेलाच बरा. अत्यंत जुने कडवट शिवसैनिक असा पुषोत्तम बर्डे यांचा लौकिक आहे. अगदी स्वर्गीय बाळासाहेबांपासून  उद्धव ठाकरेंपर्यंत त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. अशा जिल्हाप्रमुख पदावरील जेष्ठ शिवसैनिकाला  पत्र लिहून खंत व्यक्त करावी लागत आहे.

आपला जुना मित्र पक्ष असलेल्या भाजपने विश्‍वासघात केला अन्‌ तुम्ही राजकारणाचा नवा मार्ग स्वीकारला. तुमच्या या निर्णयाशी महाराष्ट्रातील शिवसैनिक खंबीरपणे उभा राहिला. तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आम्हाला आनंदच आहे पण जिल्हा अन्‌ तालुक्‍याच्या शिवसेनेला राष्ट्रवादी डावलू लागली आहे. मुख्यमंत्री आपला आहे, लोक आमच्याकडे आशेने कामे घेऊन येत आहेत, त्यांची आम्ही कामे करू शकत नसल्याची व्यथा सोलापूरच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मांडली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर शिवसेनेचे महत्त्व कमी होईल अशी भीती व्यक्त करत तुम्ही लक्ष घाला, आम्हाला ठोस पर्याय द्या अशी मागणीच जिल्हा प्रमुख बरडे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सोलापुरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आले. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सोलापूरच्या दौऱ्यावर येतात. या सर्व दौऱ्यामध्ये, बैठकांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याची खदखद जिल्हाप्रमुख बरडे यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री भरणे सोलापूरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत नाहीत, शासकीय कामकाज असो की निर्णय प्रक्रिया, यामध्ये शिवसेनेला स्थान मिळत नसल्याने सोलापुरातील शिवसेनेचे महत्त्व कमी होत असल्याची भीतीही जिल्हा प्रमुख बरडे यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर महापालिकेत शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचा सदस्य विराजमान झाला आहे. जिल्हा परिषदेतही शिवसेनेचे सदस्य आहेत. महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचीही खंत जिल्हा प्रमुख बरडे यांनी व्यक्त केली आहे.

रायगड पाठोपाठ आता सोलापुरातही शिवसेना राष्ट्रवादी कलह सुरु झाला आहे. रायगडचा संघर्ष वेळीच आटोक्यात आला . आता हाच रायगड पॅटर्न सोलापुरात अमलात आणला जातो का ? हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत