राष्ट्रवादीला धोका स्तुतीपाठकांकडून ;अजूनही खऱ्या चिंतना पासून पक्ष दूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन दिवसाचे चिंतन शिबीर कर्जत जवळील रॅडिसन ब्ल्यू या तारांकित हॉटेल मध्ये सुरू आहे. या चिंतन शिबिराचे पहिले सत्र पत्रकारांसाठी खुले होते या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा शरद पवार पंतप्रधान होण्याबाबत सूतोवाच केले . यावेळी बोलताना ते म्हणाले २०१९ हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे असेल . आणि अशी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल कि शरद पवार हे पंतप्रधान होतील . उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या पण कसे होतील हे कोणीच प्रफुल पटेल यांना विचारले नाही . पक्षाला धोका आहे तो अशा स्तुतीपाठकांपासूनच .देशात अनेक अल्प खासदारांचे पाठबळ असलेले नेते पंतप्रधान झाले ,ती परिस्थिती आता नाही . शरद पवार हे या पदासाठी नक्कीच कर्तबगार आहेत पण राजकारण संख्याबळावर चालते ,हे लक्षात घेण्यास राष्ट्रवादीचे नेते तयार नाहीत . पक्ष बूथ पातळीवर मजबूत करणे , नोटाबंदी ,जीएसटी चे फसलेले धोरण , आणि विद्यमान सरकारला आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेले अपयश, या विषयावर बूथ पातळीवर काय प्रयत्न केले पाहिजेत याबाबतचे चिंतन होण्याची अपेक्षा आहे. अजूनही काँग्रेस पक्षाविषयीची राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे असे वाटत नाही . काँग्रेस राष्ट्रवादी एक दिलाने लढले तरच महाराष्ट्रात हे सरकार पराभूत होऊ शकते मात्र दोन्ही पक्षाचा इगो यामध्ये आड़वा येतो . पण या दोन दिवसात काही जरी चिंतन झाले तरी महाराष्ट्र नव्हे तर देशातील सर्वच राजकीय पक्षांची धोरणे गुजरात निवडणुकीनंतरच ठरतील हे मात्र नक्की.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत