राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५व्या तुकडीतील जवानांचा दीक्षान्त संचलन सोहळा

पुणे : रायगड माझा वृत्त

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५व्या तुकडीतील जवानांचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात झाला. यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३५व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन समारोह शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावेळी प्रबोधिनीचे २६१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या सेवेमध्ये प्रवेश केला. यामध्ये लष्करातील १८६, नौदलतील २१ आणि हवाई दलातील ५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच अफगाणिस्तान, भूतान, कझाकस्तान, टांझानिया, लेसोथो, ताजिकिस्तान, मॉरिशस, व्हिएतनाम आणि श्रीलंका या मित्रराष्ट्रांतील १६ विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश आहे. प्रबोधिनीतील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जाणारा प्रेसिडेंट गोल्ड मेडल कॅप्टन जयप्रीत सिंह याला लष्करप्रमुख रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच परिमल पराशर याला ‘प्रेसिडेंट’स सिल्व्हर मेडल, तर स्वप्नील गुप्ता याला ‘प्रेसिडेंट ब्राँझ’ मेडलने सन्मानित करण्यात आले.

रावत म्हणाले, आगामी काळात बदलते तंत्रज्ञान हे या विद्यार्थ्यांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. युद्धाचे स्वरूप बदलत आहे. अशा बदलत्या काळात स्वतःतील कौशल्यांना समृद्ध करत विद्यार्थ्यांनी यश मिळविले पाहिजे.

माझ्या कुटुंबातील कोणीही लष्करामध्ये नव्हते. सैनिकी शाळेत शिकत असतानाच लष्करामध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. एनडीतील अनुभव फार चांगला होता. प्रत्येक दिवस हा वेगळा तसेच आव्हानात्मक होता. दररोज नवीन काही तरी शिकायला मिळायचे.- कॅप्टन जयप्रीत सिंह, प्रेसिडेंट गोल्ड मेडलविजेता

एनडीएमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर देशावर येणाऱ्या कुठल्याही धोक्याला सामोरे जाण्यासाठी मी आता तयार झालो आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याचे प्रशिक्षण एनडीएमध्ये दिले जाते. एनडीएतील तीन वर्षांच्या शिक्षणातील आजचा दिवस सर्वात मोठा आहे. आता डेहराडून येथे लष्करी प्रशिक्षण घेणार आहे – कॅ. परिमल पराशर, प्रेसिडेंट सिल्व्हर मेडलविजेता

तीन वर्षांपासून आजच्या दिवसाची वाट पाहत होतो. माझे लहानपण मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात गेले आहे. आता डुडिंगल येथे हवाई दलाच्या प्रबोधिनीत पुढील शिक्षणासाठी दाखल होणार आहे. घरातील कोणीही लष्करात नव्हते. कुटुंबातील पहिली व्यक्ती लष्करात दाखल होत असल्याने आईवडिलांना आनंद झाला आहे. – कॅ. स्वप्नील गुप्ता, प्रेसिडेंट ब्राँझ मेडलविजेता

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत