राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या या शुभेच्छा संदेशामुळे राजयकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्‍या आहेत. राहुल यांना उद्धव ठाकरे एवढे जवळचे कसे वाटू लागले, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.


राहुल गांधी यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्‍यांनी ट्विटमध्ये म्‍हटले आहे की, ‘उद्धव ठाकरे यांना त्‍यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्‍यांना नेहमी  उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो’.

सत्‍तेत असुनही विरोधकाची भूमिका घेत उद्धव ठाकरे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. त्‍यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. असे असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची होत असलेली जवळीक चर्चेचा विषय होत आहे. मागच्या आठवड्यात संसदेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना मिठी मारल्‍यानंतर शिवसेनेकडून त्‍यांचे कौतुक करण्यात आले होते. त्‍यामुळेही राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्‍यावेळी शिवसेनेकडून राहुल गांधी यांचे कौतुक आणि आता राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना वाढविसाच्या शुभेच्छा, या दोन्ही गोष्‍टींमुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या जवळीकीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.