राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची भेट

पणजी: रायगड माझा वृत्त

‘राफेल’ करारावरून देशात गदारोळ माजला असताना आणि ‘राफेल’ची गुपितं पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राहुल गांधी हे शनिवारपासून गोव्यात आहेत. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी याही त्यांच्या समवेत आहेत. आज सकाळी अचानक राहुल गोवा विधानसभेत आले आणि मुख्यमंत्री पर्रिकर यांना भेटले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छाही दिल्या.

खुद्द राहुल यांनीच या भेटीचं ट्विट केलं आहे. ‘आज सकाळीच मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत कवळेकर यांनीही या भेटीची माहिती दिली. ‘ही भेट अत्यंत खासगी आणि अवघ्या पाच मिनिटांची होती. राफेलच्या ऑडिओ टेप संबंधी कुठलीही चर्चा झाली नाही,’ असं ते म्हणाले. पर्रिकरांच्या भेटीनंतर राहुल यांनी काँग्रेसच्या आमदारांचीही भेट घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत