रिक्षाचालकाने प्रवाश्याचे ५ लाख केले परत

पुणे : रायगड माझा वृत्त 

रिक्षा प्रवासादरम्यान वृद्ध प्रवाशाचे रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये, रिक्षा चालकाने त्यांच्या घरी नेऊन परत केल्याची घटना गुरुवारी घडली. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक मारुती दगडू वाघमारे (वय ६०) यांचा कोंढवा पोलिसांनी सत्कार केला.

प्रकाश मोतीराम करमचंदानी (वय ७२, रा-कोंढवा खुर्द) गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाघमारे यांच्या रिक्षातून मार्केट यार्ड येथून कोंढव्याला गेले. करमचंदानी यांना सोडून वाघमारे रिक्षात सीएनजी भरण्यासाठी गेले. या दरम्यान करमचंदानी यांना पैसे रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते कोंढवा पोलिस ठाण्यात पैसे रिक्षामध्ये विसरले आहेत, अशी तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी वाघमारे पैसे परत करण्यासाठी प्रवाशाच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी त्यांना कोंढवा पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.

रिक्षामध्ये पाठीमागील सीटवर एक पिशवी दिसली. त्या पिशवीमध्ये पाहिल्यावर पैसे दिसले. त्यानंतर लगेच प्रवाशाच्या घरी पैसे परत देण्यासाठी गेलो, अशी भावना वाघमारे यांनी व्यक्त केली. वाघमारे सिंहगड रस्त्यावर गणेश मळा येथे राहतात. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत