रेल्वे प्रवाशाकडे सापडलं १७ किलो सोनं; सोनं पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले

रायगड माझा वृत्त 

रेल्वेतील एका प्रवाशाकडे तब्बल १७ किलो सोनं सापडलं आहे. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेलं सोनं पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सुर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होता. मनीष असं या प्रवाशाचं नाव असून टीसीच्या प्रसंगावधनामुळे हा प्रकार उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी मनीषला सुरत पोलिसांच्या हवाली केलं आहे. मनीष एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.

मनीष मुंबईहून सुरतकडे चालला होता. बोरिवलीहून त्याने प्रवासाला सुरुवात केली होती. सुर्यनगरी एक्स्प्रेसच्या S9 कोचमध्ये मनीष प्रवास करत होता. यावेळी बॅगेतून तो तब्बल १७ किलो सोनं घेऊन जात होता. टीसीला मनीषच्या हालचालींवरुन संशय आल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवलं. रेल्वे पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन तपासणी केली असता आश्चर्याचा धक्काच बसला.

रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता आपल्याला हे पार्सल सुरतला पोहोचवण्यास सांगितलं होतं. त्याबद्दल आपल्याला कमिशनही मिळणार होतं असं त्याने सांगितलं. विशेष म्हणजे त्यालाही आपल्या बॅगेत इतकं सोनं आहे याची कल्पना नव्हती. पोलिसांनी सोनं जप्त केलं असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत ५ कोटी १० लाख रुपये आहे. हे सोनं कोणाकडे पोहोचवण्यात येत होतं, तसंच कोणी पाठवलं होतं यासंबंधी पोलीस पुढील तपास करत आहेत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत