रोटरी क्लबचा तीन हजार शौचालयांचा संकल्प!

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यातील आदिवासीवाडी झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ इंडिया वरळी मुंबई  या सेवाभावी संस्थेच्या वतीने अत्याधुनिक शौचालय उदघाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी वर्षभरात महाराष्ट्रात तीन हजार शौचालये बांधून लोकार्पण करण्याचा संकल्प रोटरी क्लबने केला असल्याचे रोटरीचे मुख्य समन्वयक दिलीप मुळे यांनी सांगितले.

रोटरी क्लबने दोन वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या झुगरेवाडीकरिता भविष्यात वरदान ठरतील असे अनेक उपक्रम  राबवत असल्याची माहिती रोटरी क्लबच्या पदाधिकारी कविता गोडबोले यांनी दिली.
नागरी सुविधांपासून कित्येक कोस दूर असलेल्या व विकासाचा मागमूस नसलेल्या झुगरे वाडीचा कायापालट करण्यासाठी रोटरी क्लबने कंबर कसली असून येथील विद्यार्थ्यांसहित नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यापूर्वी क्लबने येथील मुलांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. येथील विदयार्थ्यांची नैसर्गिक विधीची शौचालयाअभावी आबाळ होत असल्याने मुलामुलींकरिता अत्याधुनिक सुविधांनी युक्त 5 स्वतंत्र शौचालये बांधण्यात आली आहेत.
येथील वीज व पाण्याची मूलभूत समस्या हेरून त्यावर उपाययोजना करण्यासाठी रोटरी प्रयत्नशील असून येथे सौरविद्युत प्रकल्पद्वारे कायमस्वरूपी वीज व  पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कविता गोडबोले यांनी दिली. गेली दोन वर्षे ही शाळा क्लबने दत्तक घेतली असून मागील वर्षांपासून शाळेला विद्युतपंखे, टीव्ही, टेबल अश्या अनेक भौतिक सुविधा आम्ही दिल्या आहेत. तसेच येथील कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना म्हणून या मुलांना डाळ खिचडी, चिक्की,फलाहार इ. दिला जात आहे.या पोषण आहाराला जोड म्हणून शेवगा व इतर भाज्या या भविष्यात उपलब्ध व्हाव्यात म्हणून भाज्या व वृक्षलागवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शाळेतील 130  विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे बूट मोजेदेखील वाटप करण्यात आले .विद्यार्थिनीची  अडचण लक्षात घेऊन त्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप व त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता सतत प्रयत्नशील राहुन त्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या मुख्याध्यापक रवी किसन काजळे यांचा क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी अत्याधुनिक शौचालयाचे उदघाटन व अनावरण रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शशी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ इंडियाचे जिल्हा प्रशासक शशी शर्मा, प्रफुल्ल शर्मा,जयंती नायरी, योगेश गुप्ता ,कविता गोडबोले ,संस्था संचालक व माजी आमदार दिगंबर विशे ,साद फाउंडेशनचे संस्थापक प्रदीप कुलकर्णी इ.मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाकरिता  शालेय समितीचे पदाधिकारी,रोटरीचे सदस्य व कार्यकर्ते, ग्रामस्थ इ. उपस्थित होते. रोटरीचे ऋषी मोहिते,प्रथमेश चव्हाण व निशा देरंगे यांनी मनोरंजनातून मुलांना काही महत्वाचे धडे दिले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत