रोहा तालुक्यातील २२ पैकी २१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच

कोलाड : कल्पेश पवार

रोहा तालुक्यातील २२ पैकी २१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच राष्ट्रवादीतील नेतेमंडळी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या पसरत होत्या. त्यामुळे बंडखोरांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे सर्व विरोधक आघाडीच्या माध्यमांतून एकत्र आले होते व प्रचाराची राळ उठवली होती. मात्र असे होऊनही राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणूकीत जबरदस्त मुसंडी मारली व वर्चस्व कायम ठेवले.

राष्ट्रवादीने खारगाव, आरे बुद्रुक, मडाली, देवकान्हे, ऐनवहाळ, जामगाव, आंबेवाडी, वाली, नेहरूनगर, वरसगाव, भिसे, मेढा, पिंगळसई, धोंडखार, पिगोंडा, वणी, कडसुरे, चिंचवली, कोलाड, कुडली, भालगाव या ग्रामपंचायतींवर आपले सरपंच बसवले आहेत तर शिवसेनेला एका ग्रामपंचायतीवरील सरपंचपदावर विजय मिळवता आला.

स्थानिक आघाड्यात सहभागी झालेल्या भाजपला फार मोठा फटका बसला असून काही ठिकाणी तर त्यांना आनामत रकमा गमवाव्या लागल्या आहेत. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणूकीत सरपंच राष्ट्रवादीचा असला तरीही राष्ट्रवादीला पाच तर स्थानिक विकास आघाडीला सहा जागा मिळाल्याने उपसरपंच निवडणूकीत राष्ट्रवादीची परिक्षा असेल. तसेच कुडली ग्रामपंचायतीतही आघाडीने सहा जागा मिळवत बहुमत राखले असले तरी सरपंचपद राष्ट्रवादी कडे गेल्याने इथेही दोन्ही पक्षांची परिक्षा असेल. अन्य ग्रामपंचायतीत बहुमताचा आकडा पार करायला राष्ट्रवादीला फारसे कष्ट पडणार नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.

रोहा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची जोरदार मुसंडी मारण्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच प्रचारात सगळ्या ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेला सामान्य मतदारांची चांगली पसंती मिळाल्याचा दावा कार्यकर्ते करत होते. रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने एक सरपंचपद व २७ सदस्य निवडून आणले.  यात पिंगलसई २, मढाली २, भालगाव ४, कुडली ६, आंबेवाडी २, वांगणी सरपंच व ७ सदस्य, मेढा २, बाहे १ व भिसे १ असे सदस्य निवडून आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत