रोहा येथील विनिता देवकर खुन खटल्याप्रकरणी चार महिला आरोपींना जन्मठेप!

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सोनखार पो, न्हावे, ता. रोहा गावच्या हद्दीत 4 सप्टेंबर 2012 रोजी घडलेल्या विवाहिता जळीत प्रकरणातील सर्व आरोपींना माणगांव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व दंडाची शिक्षा सुनावली असून दंड रक्कमेतून मयत महिलेच्या मुलाला आर्थिक मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, रोहा पोलिसस्टेशनच्या हद्दीतील मौजे सोनखार,  पो, न्हावे, ता. रोहा गावच्या हद्दीत 4 सप्टेंबर 2012 रोजी आरोपी सविता उर्फ मनाली मिननाथ कटोरे, कमलाय महादेव बसवत, ललिता प्रदीप पाटील, या फिर्यादीच्या नात्याने नणंदा आहेत  व आरोपी सुरेखा उर्फ प्रणाली पांडुरंग दिवकर हि नात्याने मयत फिर्यादीची जाऊबाई आहे व आरोपी पांडुरंग जानु दिवकर हा फिर्यादीचा नात्याने दिर आहे.

फिर्यादी व आरोपी सुरेखा दिवकर व पांडुरंग दिवकर हे वडिलोपार्जित एकाच घरात शेजारी शेजारी वेगवेगळे रहातात. दोन्ही घरांना एक सामायिक वीज मीटर असून सदर वीजमीटर आरोपी सुरेखा व पांडुरंग दिवकर यांचे खोलीमध्ये आहे. मिळकतीचे येणारे लाईटबिल व घरपट्टी मयत विनिता दिवकर हिचे पती गणेश जानु दिवकर व आरोपी पांडुरंग दिवकर हे अर्धे अर्धे भरतात. दि. 4 सप्टेंबर 2012 रोजी मयत विनिता देवकर हिच्या मुलाचा वाढदिवस असल्याने तिने तिचा नवरा गणेश दिवकर याला केक आणण्यास सांगितले.

गणेश दिवकर बाहेर गेल्यानंतर विनिता हिस आरोपी पांडुरंग दिवकर याने लाईटबिल भरण्यासाठी बिल आणुन दाखवले. मयत विनिता हिने लाईटबिल भरायचे नाही असे सांगितले. त्यावेळी आरोपी पांडुरंग दिवकर याने घरपट्टी भरली आहे असे सांगितले. त्या कारणावरून मयत विनिता व पांडुरंग यांच्यात वाद होऊन आरोपी सविता कटोरे, कमलाय बसवत, ललिता पाटील, सुरेखा दिवकर यांना राग येऊन त्यांनी मयत विनिता हिस शिविगाळ केली.

आरोपी सविता कटोरे, कमलाय बसवत, ललिता पाटील, सुरेखा दिवकर या तीन आरोपींपैकी आरोपी मनाली हिने मयत हिस पकडून ठेऊन आरोपी सुरेखा दिवकर हिने मयत महिलेवर रॉकेल ओतून काडीने पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी पांडुरंग दिवकर हा जवळच उभा राहून मरु दे हिला असा म्हणाला. या प्रकरणात मयत विनिता हि जास्त प्रमाणात भाजल्याने तिस प्रथमोपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या वर प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता सायन हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले. तिच्यावर उपचार चालु असतांना ती मयत झाली.

घटनेची फिर्याद घेत रोहा पोलिसांनी भादविस कलम 302, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास श्री. एस. एम. सोळसे, स.पो.नि. रोहा पोलिसठाणे यांनी तपास करुन न्यायालयात दोषपत्र सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी माणगांव रायगड येथील सत्र न्यायालयात झाली असून या न्यायालयात सहा. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने प्रभावीपणे युक्तीवाद करून न्यायालयात महत्वाचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले.

रोहा तहसिलदार श्री. मिलींद मुंडे यांची साक्ष सदर केसच्या कामी महत्वाची ठरली. तसेच सदर काम करत असतांना पैरवी अधिकारी पी.के. जाधव, शशिकांत कासार, पो.कॉ. पवार यांनी मदत केली. अभियोग पक्षाने कोर्टासमोर प्रभावीपणे केलेला युक्तीवाद व साक्षीपुराव्यावरून माणगांव सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.व्ही. लोखंडे यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी सविता उर्फ मनाली, मिननाथ कटोरे, कमलाय महादेव बसवत, ललिता प्रदिप पाटील, सुरेखा उर्फ प्रणाली पांडुंरग दिवकर यांस दोषी ठरवून दि. 30 ऑगस्ट 2018 रोजी भादवीस कलम 302 अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेपैकी रु. 30 हजार रक्कम विनिताचा मुलगा प्रथमेश यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत