लगोरी खेळाला पुनः शालेय स्पर्धेत समाविष्ट करावे ; आ. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेत मागणी 

रोहे : महादेव सरसंबे 

लगोरी खेळाला शालेय स्पर्धेत पुनः समाविष्ट करून घ्यावे,अशी मागणी महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष आ. अनिकेत तटकरे यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.

२०१० सालापासून नोंदणीकृत महाराष्ट्र लगोरी संघटना कार्यरत आहे. या संघटनेकडून विविध वयोगटात आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्र्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. २०१४ साली या खेळाचा महाराष्ट्राच्या शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश केल्याने स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूला किंवा विद्यार्थ्याला दहावी – बारावीच्या परीक्षेत अवांतर गुण मिळत असत, तसेच विविध शिष्यवृत्ती आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळत होता.

२०१८ – १९ च्या भारतीय शालेय खेल महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा लगोरी खेळाचा समावेश केला असल्याचे स्पष्ट करताना आ. तटकरे, महाराष्ट्र शासनाकडून पुनः मान्यता मिळविण्यासाठी निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास बोलून दाखविला. पारंपरिक देशी खेळांना प्राधान्य देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मे रोजी मन की बात, या कार्यक्रमात लगोरी या खेळाची माहिती सांगितली आहे.

लगोरी हा खेळ प्राचीन तसेच पारंपरिक असून देशात विविध नावांनी ओळखला व खेळला जातो. अशा खेळांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे, या खेळाच्या संवर्धनासाठी शासनाकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले होते. देशाचे माननीय पंतप्रधान जर खेळाच्या वृद्धीसाठी एवढे झटत असतील आणि देशातील बहुतांशी राज्ये लगोरी खेळाला प्राधान्य देत असतील, तर महाराष्ट्र शासनाची किंवा क्रीडा विभागाची कचखाऊ भूमिका कशासाठी !असा गुरव यांचा जळजळीत सवाल आहे. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत