लग्नाच्या दहाव्या दिवशीच तिने दिली नवऱ्याची सुपारी, टोकन म्हणून दिली अंगठी

विजयनगर : रायगड माझा 

कर्नाटकमधील विजय नगर येथे लग्नाच्या दहाव्या दिवशी एका नववधूने आपल्या पतीची सुपारी गुडांना देऊन त्याची हत्या करून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे या कामासाठी तिने गुंडांना टोकन म्हणून लग्नात नवऱ्याने तिला दिलेली अंगठी दिली. त्यानंतर गुंडांनी पतीला ठार करून दागिेने लुटल्याचा बनावही तिने केला. मात्र पोलिसांना यात काळेबेरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी तिला धारेवर घेतले. त्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. सरस्वती(२२) असे तिचे नाव असून गौरीशंकर(३०) असे तिच्या पतीचे नाव होते.

गौरीशंकर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून तो बेल्लारी येथील एका कंपनीत काम करत होता. सरस्वतीबरोबर त्याचा विवाह ठरला होता.यामुळे तो आनंदीत होता.पण गौरीशंकरचे वय जास्त असल्याने सरस्वतीला हे लग्न मान्य नव्हते. पण आईवडिलांना विरोध करणे शक्य नसल्याने तिने लग्नानंतरच गौरीशंकरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. २८ एप्रिलला त्यांचे लग्न झाले. लग्नाला दहा दिवस झाल्यानंतर सरस्वतीने गावातील बी टेक झालेल्या पण बेकार असलेल्या गावगुंडाना हाताशी धरले. पतीला संपवण्यासाठी तिने त्यांना १० हजार रुपयाची सुपारी दिली. पण त्यांनी टोकन मागितल्याने तिने लग्नात पतीने तिला दिलेली अंगठी त्यांना दिली.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे तिने लग्नाच्या दहाव्या दिवशी गौरीशंकरला बाहेर फिरायला जाऊया असे सांगितले. गौरीशंकरही तयार झाला .दोघे बाहेर फिरायलाही गेले. रात्री आठ वाजता मोटारसायकलवरून दोघे घरी परतत असताना अचानक तीन गुंड तिथे आले. त्यांनी गौरीशंकरला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली व पळ काढला. सगळे ठरल्याप्रमाणे झाल्याने सरस्वती मनातून खुश होती. पम कोणाला संशय येऊ नये म्हणून ती पोलीस ठाण्यात गेली. गुंडांनी पतीला ठार करुन आपले दागिणे लुटल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिची तक्रार लिहून घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.पण चौकशीदरम्यान सरस्वतीचा जबाब सातत्याने बदलत असल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या बँक खाते व मोबाईल चॅटचा रेकॉर्ड तपासला. त्यातून सरस्वतीनेच पतीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी तिला पोलीसी खाक्या दाखवताच सरस्वतीने आपणच पतीची सुपारी गुंडाना दिल्याचे कबूल केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.