लवकरच शंभराची नवी नोट चलनात ,जुन्या नोटाही चालनात राहणार

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

भारतीय रिझर्व्ह बँक १०० रुपयांची नवी नोट चलनात आणत असून ही नोट फिक्कट जांभळ्या रंगाची असणार आहे. महात्मा गांधी सीरिजमधील या नोटेच्या दुसऱ्या बाजूला गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘राणीच्या विहिरीला’ स्थान देण्यात आले आहे.

नोटेवर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. नोटेचा आकार ६६ मि.मी. x १४२ मि.मी. इतका आहे. ही नोट चलनात आल्यानंतरही आधीच्या १०० रुपयाच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकने स्पष्ट केले आहे. १०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर त्याचा पुरवठा वेगाने करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

१०० रुपयाच्या नव्या नोटेची वैशिष्ट्ये…

– १०० हा अंक नोटेच्या खालील बाजूस असेल.
– देवनागरी लिपीतील १०० हा अंक गांधीजींच्या फोटोच्या डाव्या बाजूला असेल.
– मध्यभागी गांधीजींचा फोटो असेल.
– सूक्ष्म अक्षरांत RBI, भारत, INDIA आणि 100 चा उल्लेख करण्यात आला आहे.
– गांधीजींच्या फोटोच्या उजव्या बाजूला गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी व हमी देणारा संदेश असेल.
– नोटेच्या अगदी उजवीकडे अशोक स्तंभाला स्थान देण्यात आले आहे.
– नोटेच्या मागील बाजूस राणीच्या विहिरीचे चित्र आहे.
– तिथेच बाजूला स्वच्छ भारत मोहिमेचे चिन्ह आणि संदेश आहे.
– अगदी डावीकडे नोटछपाईचे वर्ष देण्यात आले आहे.

 

राणीची विहीर- एक जागतिक वारसा

राणीची विहीर हे गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. युनेस्कोने २०१४मध्ये या वास्तूला जागतिक वारसा म्हणून मानाचे पान दिले. भारतातील सर्व विहिरींची राणी असा या विहिरीचा गौरव युनेस्कोकडून करण्यात आला. राणी उदयामतीने दहाव्या शतकात ही भव्यदिव्य अशी विहीर बांधली होती. विहिरीची लांबी ६४ मीटर असून रुंदी २० मीटर तर खोली २७ मीटर आहे. गुजराती भाषेत विहिरीला बाव म्हणतात. म्हणूनच या विहिरीला राणीची विहीर असे नाव पडले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत