लोकलमधून थुंकणं जिवावर बेतलं, दोन तरुणांचा मृत्यू

मुंबई : रायगड माझा वृत्त 

लोकलमधून थुंकण्याचा नादात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. सरफराज समीर खान आणि अमीन सय्यद अशी या तरुणांची नावे आहेत. लोकलमधून थुंकत असताना तोल गेल्याने सरफराज याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अमन सय्यद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज समीर खान आणि अमन सय्यद मुंब्र्याहून सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करत होते. दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यात दर्शनासाठी त्यांना जायचं होतं. मुंब्रा येथून त्यांनी स्लो लोकल पकडली होती. घाटकोपर स्थानकावर उतरुन त्यांनी सीएसटीएमला येणारी फास्ट लोकल पकडली.

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर सरफराज थुंकण्यासाठी लोकलबाहेर झुकला असता त्याचा तोल गेला आणि खाली पडला. यावेळी अमन दरवाजात उभा होता. सरफराजसोबत त्याचाही तोल गेला. या दुर्घटनेत सरफराज जागीच ठार झाला, तर अमन गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत