लोकल ट्रेन सर्वसामान्यांना सुरु होणार; फैसला मंगळवारी

महाराष्ट्र News 24

मागील दहा महिन्यापासून बंद झालेल्या लोकल ट्रेन सर्वसामान्यांना सुरु होण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत माहिती दिली. लोकल प्रवासाची परवानगी सर्व नागरिकांना खुली करण्यास हरकत नाही. मात्र अजूनही अनेक प्रवासी मास्क लावत नाही असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. रेल्वे प्रवास करण्याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊननंतर सुरुवातील वैद्यकीय, पालिका कर्मचार्‍यांनंतर सरकारी कर्मचारी, वकिलांसाठी लोकल सुरू करण्यात आली, मात्र अजूनही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलबंदी आहे. या संदर्भात वकिलांच्या लोकल प्रवासासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने दाखल झालेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. लोकल प्रवासाचा निर्णय केवळ सरकारी अधिकार्‍यांवर सोपवून चालणार नाही. मंत्र्यांनीही यात जातीने लक्ष घातले पाहिजे. कारण सरकारी आणि खासगी कार्यालयीन वेळा बदलून लोकल गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्याबाबत योजनाबद्ध पॉलिसी तयार करण्याची गरज आहे, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागच्या सुनावणीत केली होतीत्यावेळी राज्य सरकारने एका आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाला कळविले होते.

शुक्रवारच्या सुनावणीत न्यायालयाने सुरुवातीलाच सर्वासामान्यांना लोकल सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे, असा कळीचा प्रश्न सरकार पक्षाला विचारला. त्यावर कुंभकोणी म्हणाले, लोकल प्रवासाची मुभा सर्वांना देण्यास आमची हरकत नाही. मात्र लोक सार्वजनिक ठिकाणी अजूनही मास्क लावत नाहीत. लोकल सर्वांना खुली करण्याच्या निर्णयासाठी दिलेल्या आदेशानुसार अजून आठ दिवस पूर्ण झालेले नाहीत. मंगळवारी आठ दिवस पूर्ण होत असून त्या वेळी मंत्रालयात होणा-या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी बुधवार दि. 13 जानेवारी पर्यंत तहकूब ठेवली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत