लोकसभा निवडणुकीत भाजपचे ‘स्टार’ उमेदवार

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित, ‘खतरो का खिलाडी’ अक्षयकुमार, स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग व कपिल देव यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींना २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या कल्पनेवर भाजपचे नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. या ‘स्टार’ प्रचारकांच्या माध्यमातून शहरी मतदारसंघांमध्ये वातावरण निर्माण करून विजय निश्चित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, भप्पी लहरी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कपिल देव, माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग अशा राजकारणाबाहेरच्या; पण जनमानसावर प्रभाव टाकू शकणाऱ्या सेलिब्रिटींना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या पर्यायाची सध्या भाजपमध्ये गंभीरपणे चाचपणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा खंदा समर्थक असलेला चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेता भाजपच्या वतीने या अभिनेत्यांशी संपर्क साधून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  दिल्ली, मुंबई, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात २०१४ मध्ये मिळवलेल्या विजयाची यंदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे भाजपने पुन्हा सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे. दिल्लीत भाजपने गेल्यावेळी सातही जागा जिंकल्या होत्या; पण आता त्या कायम राखणे अवघड ठरणार असल्यामुळे चित्रपट कलावंत आणि क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याचा विचार सुरू आहे. गौतम गंभीर आणि अक्षयकुमार यांना दिल्लीत, तर सेहवाग आणि कपिल देव यांना हरयाणातून उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हेमामालिनी, किरण खेर, परेश रावल, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, बाबूल सुप्रियो, मनोज तिवारी, ऑलिम्पिक रौप्यपदकविजेते राज्यवर्धन राठोड, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना मैदानात उतरवले आणि त्यांचा विजय निश्चित केला होता. बॉलीवूडचे कलावंत आणि क्रिकेटपटूंच्या साह्याने शहरी मतदारसंघांवर भाजपची पकड कायम ठेवण्याचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मतदारसंघ बदलणार?
हेमामालिनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबूल सुप्रियो, व्ही. के. सिंह यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असले, तरी या वेळी काहींचे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंडखोर शत्रुघ्न सिन्हांनी यंदा भाजपकडून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत