लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीस जळगावातून सुरुंग

Congress-Ncp

जळगाव : रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसची आघाडी झालेली आहे. असे असले तरी या आघाडीस जळगाव जिल्ह्यातून सुरुंग लागल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेताच प्रचारात उतरल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत न घेताच संपर्क दौरे करीत आहेत. आघाडी आहे तर काँग्रेसला सोबत न घेता दौरे कसे करता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाहीत, असे ते म्हणाले. रावेर लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका कार्यकर्त्यांची असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले.

धुळ्यास दहा हजार कार्यकर्ते जाणार
ॲड. पाटील म्हणाले, की एक मार्चला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी धुळे येथे येणार आहेत. धुळ्याला दहा हजार कार्यकर्ते जळगावहून नेण्याचे नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश नक्कीच मिळेल. राफेल घोटाळ्याची चौकशीसाठी समिती भाजप का नेमत नाही. राजीव गांधींवर जेव्हा बोफोर्स घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा जेपीसी समिती नेमली होती. त्यात गांधी यांना क्‍लीन चीट मिळाली होती. राफेल घोटाळा, शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. यामुळे या निवडणुकीत सत्तांतर होईल.आघाडी असल्याने काँग्रेसचाही खासदार असावा, अशी सर्वच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

डॉ. पाटील, फालक इच्छुक
रावेर लोकसभेची जागा आम्हाला मिळावी, तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करीत आहोत. माजी आमदार निळकंठ फालक, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार देवकरांनी सोमवारी चाळीसगाव, भडगाव आदी तालुक्‍यातून संपर्क अभियान सुरू केले. त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना येऊन भेटायला हवे होते. सर्व तालुका पदाधिकारी, फ्रंटलच्या क्रमांक घेऊन त्यांना सोबत घेऊन दौरा करायला हवा होता. ते गावात जातात तेथून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून रेस्ट हाऊसवर बोलावतात. संपर्क करताना घरासमोर जातात, मात्र घरी येत नाही. अशी वागणूक बरोबर नाही. यावेळी महानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, बाळासाहेब पवार, डी. जी. पाटील आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत