लोकसभा निवडणुकीसाठी “स्मार्ट इव्हीएम’

जिल्ह्यासाठी आठ हजार 20 बॅलेट तर चार हजार 600 कंट्रोल युनिट

  • बंगळुरू येथून बुधवारी होणार नगरला दाखल
  • जिल्ह्यात तीन हजार 722 मतदान केंद्रे

रायगड माझा वृत्त 

नगर – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मागील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इव्हीएम एम-1 व एम-2 मध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने दक्षता घेत, भारत इलेक्‍टॉनिक्‍स लिमिटेड या बंगळुरू येथील कंपनीकडून एम-3 मशिन तयार करून घेतल्या असून, येत्या बुधवारी केडगाव गोदामात रात्री उशिरा दाखल होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या दृष्टीने नवीन एम-3 प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिन (इव्हीएम) जिल्ह्याच्या ठिकाणच्या निवडणूक विभागाच्या गोदामात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यासाठी एम-3 प्रकारचे आठ हजार 20 बॅलेट युनिट (बीयू) तर चार हजार 600 कंट्रोल युनिट (सीयू) बंगळुरूमधून बुधवारी (दि. 8) उशिरा नगरमध्ये दाखल होतील. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन मतदार संघांत मिळून तीन हजार 722 मतदान केंद्रे आहेत. नगर जिल्ह्यात यापूर्वी केवळ एम-1 प्रकारचे पाच हजार इव्हीएम केडगावमधील जिल्हा परिषद शाळेत आहेत. एम-2 इव्हीएम मशीन जिल्ह्यात नाही.

पथक बंगळुरूला रवाना

इव्हीएम बंगळुरूमधून आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेचे पथक रवाना झाले आहे. पथकात महसूल उपजिल्हाधिकारी संदीप आहेर, नायब तहसीलदार जयसिंग भैसडे, अव्वल कारकून विजय धोत्रे, कर्मचारी प्रसाद गर्जे यांच्यासह सशस्त्र आठ पोलिसांचा समावेश आहे. हे पथक आठ ते दहा ट्रकमध्ये या इव्हीएम मशीन आणतील. हे पथक सोमवारी (दि. 6) बंगळुरूमध्ये दाखल होईल. बुधवारी (दि. 8) एम-3 इव्हीएम घेऊन हे पथक नगरमध्ये येईल, अशी अपेक्षा आहे. या इव्हीएम मशीन केडगावमधील गोदामात ठेवण्यात येणार आहे.

गोदामाचे काम युद्धपातळीवर

केडगावमधील गोदामाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता, वीज जोडणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. इव्हीएम आल्यावर या गोदामाला चार सशस्त्र पोलिसांचे संरक्षण असेल, यात एक पोलीस अधिकारी व तीन कर्मचारी असतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत