लोकसभेची तयारी; उद्धव ठाकरे शिर्डीत

अहमदनगर : रायगड माझा वृत्त 

राज्य व केंद्रातील भाजप व शिवसेना युतीतील ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर सेनेने रविवारी (२१ ऑक्टोबर) जिल्ह्यात दोन ठिकाणी शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी सकाळी ११ वाजता शिर्डीमध्ये व दुपारी १ वाजता नगर शहरात सभा होणार आहे. या दोन्ही सभांच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग सेना फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे.

सेनेने स्वबळावर सर्व निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी आता विधानसभेआधी होणाऱ्या लोकसभेच्या मोठ्या निवडणुकीची तयारी म्हणून राज्यांतील ४८ मतदारसंघांतून सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात रविवारी शिर्डीतून होणार आहे. शिर्डी मतदारसंघात त्यांची पहिली सभा होणार असून, लगेच दुपारी १ वाजता दुसरी सभा नगर लोकसभा मतदारसंघातील नगर शहरात रेसिडेन्शियल शाळेच्या मैदानावर होणार आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या दोन्ही सभांचे नियोजन केले आहे. शिर्डीच्या सभेसाठी य़ा मतदारसंघाचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे परिश्रम घेत आहेत. तर नगरच्या सभेची जबाबदारी शहराचे माजी आमदार अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यावर आहे. दोन्ही सभांतून शक्तीप्रदर्शन करायचे असल्याने गाडे व खेवरे यांनी उत्तर व दक्षिण जिल्ह्यांतील तालुक्यांतून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे दोन्ही सभांची उपस्थिती लक्षणीय असेल, असा दावा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

पाच नावे चर्चेत

लोकसभेच्या जिल्ह्यातील शिर्डी व नगर या दोन्ही जागांवरील शिवसेनेचे उमेदवार पक्षप्रमुख ठाकरे रविवारीच जाहीर करणार असल्याचे सांगितले जाते. शिर्डीत विद्यमान खासदार लोखंडे यांच्यासह नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांचे तर नगर मतदारसंघातून माजी आमदार अनिल राठोड, पारनेरचे विद्यमान आमदार विजय औटी व श्रीगोंद्याचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची नावे चर्चेत आहेत. या पाच नावांपैकी कोणती दोन नावे पक्षप्रमुख जाहीर करतात, याची उत्सुकता सेनेसह अन्य पक्षांमध्येही आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीला अद्याप पाच-सहा महिने अवधी असल्याने वातावरण निर्मितीसाठी आताच उमेदवारीची घोषणा होते की ऐनवेळी नाव जाहीर होते, याचाही संभ्रम सेनेतून व्यक्त होत आहे. कारण, भाजपकडून युतीसाठी प्रयत्न सुरू असल्याने सेनेकडून त्याला प्रतिसाद दिला गेला तर जिल्ह्यातील केवळ शिर्डीची जागा सेनेच्या वाट्याला येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही सभांतून शक्तीप्रदर्शनाचे नियोजन मात्र सेनेने केले आहे.

…तर ‘ओरिजनल भाजप’शी युती

‘नगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्याची वेळ आता टळली आहे; मात्र, काही वॉर्डांतून ‘ओरिजनल भाजप’शी शिवसेना युती करू शकते,’ अशी भूमिका माजी आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी मांडली. ‘युतीसंदर्भात भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवाय शिवसेनेने जवळपास सर्वच वॉर्डांतील उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामुळे आता युती होऊन उपयोग नाही. ऐनवेळी कोणत्या दोन-दोन लोकांना थांबवायचे, य़ाचा प्रश्न निर्माण होणार आहे. युतीची त्यांना मनापासून इच्छा असली असती तर सुरुवातीपासूनच त्यांनी तसे प्रयत्न केले असते, असेही भाष्य त्यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत