लोकसभेचे तिकिट मलाच अन्यथा अपक्ष : उदयनराजे

कराड : प्रतिनिधी

लोकशाहीमध्ये प्रत्येकजण राजा असतो. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल आपण उभे रहावे तर त्यांनी खुशाल रहावे. परंतु लोकांचा मला आग्रह आहे, त्यामुळे राष्ट्रवादी तिकिट मलाच देणार, अन्यथा मी अपक्ष उभा राहणार असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

कराडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांबरोबर आगामी निवडणुकीबाबत काय चर्चा झाली? असे विचारले असता सगळंच सांगायला लागलो तर कसे होईल, असे म्हणत त्यांनी त्याबाबत बोलण्याचे टाळले. लोकांनी मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी ते करतच राहणार.

निवडणुकीची तयारी काय करायची असते. त्यावर माझं पोट चालत नाही, असे म्हणत उदयनराजे भोसले म्हणाले, माझा ‘बी प्लान’ तयार आहे अशी सोशल मिडीयावर चर्चा असल्याचे समजते. परंतु माझ्या फोनवर सोशल मिडिया वापरू शकत नाही असे सांगत त्यांनी त्याबाबतही स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. माझे काय चुकत असेल तर त्यांनी मला अवश्य सांगावे. पण कोणी अरेरावी करीत असेल तर ती सहन केली जाणार नाही. मी काय बांगड्या घातल्या नाहीत. बघून घेईन म्हणणाऱ्यांनी मैदानात यावे. शांत बसतो म्हणून कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मी सर्वांना दिले होते. परंतु काहीजण आले नाहीत. लोकशाही असल्याने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र राजेशाही असती तर सांगितले असते, असे म्हणत उदयनराजे यांनी मी निमंत्रण देऊन ते येत नाहीत आणि तेही मला निमंत्रण देत नाहीत. न बोलावता मी जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कराड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, हा रेल्वे मार्ग झाला असता तर त्यातून सरकारच्या तिजोरीत बक्कळ पैसा जमा झाला असता. परंतु शासनकर्त्यांची मानसिकता नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची आवश्यकता नसताना त्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी संपूर्ण देशभरात रेल्वेचे नेटवर्क निर्माण केले असते तर ते लोकांना उपयुक्त ठरले असते. सत्ता आहे म्हणून कोणी, काहीही निर्णय घेत आहेत. परंतु जे चूक आहे ते चुकच म्हटले पाहिजे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

कराड-पाटणच्या कामांची यादीच देणार…
खासदार झाल्यापासून कराड-पाटणला किती निधी दिला? असे विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले, त्याचे उत्तर मला आत्ता देता येणार नाही. मात्र मी केलेल्या कामांची यादीच तुम्हाला देणार आहे. कराड नगरपालिकेला कितीही सांगितले तरी ठराव देत नाहीत. त्याला राजेंद्र यादव एकटे जबाबदार नाहीत.  सर्वांनी मिळून ठराव दिला पाहिजे. हीच परिस्थिती वाईबाबत आहे. विकासकामांचे श्रेय दुसऱ्याला जाईल म्हणून राजकारण होत आहे. मुख्याधिकारी यामध्ये आडकाठी आणत आहेत, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

त्यांनीही माझे अनुकरण केले…
शरद पवार यांनी सातारा येथे कॉलर उडविल्याबाबत विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले, कितीही केले तरी ते आदरणीय आहेत. मी त्यांना मानतो. त्यांच्याएवढे काम कोणालाही जमणार नाही. सकाळी 7 वाजता ते तयार असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही अनुकरण करतो. मात्र त्यांनी माझे अनुकरण केले. आणखी काय पाहिजे? असेही उदयनराजे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत