लोकसभेसाठी काँग्रेसचे आठ उमेदवार ठरले

मुंबई : रायगड माझा वृत्त

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आठ जागांवरील उमेदवारही ठरले आहेत. सोलापूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, धुळे, रामटेक, वर्धा तसेच दक्षिण मुंबई अशा आठ जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, नांदेडमधून अमिता चव्हाण तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसच्या वाट्याला 23 ते 25 जागा येण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या तुलनेत उमेदवार ठरवण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. उमेदवार निवडण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

त्यानुसार ज्या आठ जागांसाठी केवळ एकच नाव पुढे आले ते आठ उमेदवार निश्चित करण्यात आले. यामध्ये सोलापूरमधून काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरे, हिंगोलीतून खासदार राजीव सातव, नांदेडमधून अमिता चव्हाण, धुळ्यातून रोहिदास पाटील, रामटेकमधून मुकुल वासनिक, वर्ध्यामधून चारुलता टोकस, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांची नावे नक्की झाली आहेत.

या जागांवर एकापेक्षा अधिक उमेदवार
उत्तर मुंबईच्या जागेऐवजी उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबईतून निवडणूक लढवायला मिळावी यासाठी काही उमेदवार हट्ट धरून बसले आहेत. वायव्य मुंबईतून सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असली तरी कृपाशंकर सिंहही येथील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त निवडणूक लढवणार नसल्याने या जागी आमदार नसिम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, पण या जागेवरही कृपाशंकर सिंह हे इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईतून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी भालचंद्र मुणगेकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने काँग्रेसकडून अद्याप नावे निश्चित करण्यात आलेली नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत