लोकसभेसाठी राष्ट्रवादी ताकदीनिशी मैदानात उतरणार; नवीन चेहर्‍यांना संधी देण्यावर पक्षात एकमत

मुंबई : रायगड माझा वृत्त

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनिशी मैदानात उतरणार असून यावेळी नवीन चेहर्‍यांना संधी देण्यावर पक्षात एकमत झाले आहे. तसेच रावेर, नंदूरबार, पुणे, भंडारा-गोंदिया या चार मतदारसंघांचा जागावाटपावेळी अदलाबदल करण्याचा विचार राष्ट्रवादीच्या मनामध्ये घोळत आहे.

लोकसभेची 2019 मध्ये होणारी निवडणूक मोदी विरुध्द सर्वच विरोधी पक्ष अशी होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एकास एक उमेदवार देण्याची रणनिती काँग्रेस आघाडी आखत असल्याचे समजते. सध्या या दोन पक्षांमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्‍चित झाला नसला तरी आपल्याकडील रावेर व भंडारा-गोंदिया मतदारसंघ काँग्रेसला द्यावेत व  त्याबदल्यात काँग्रेसकडील नंदूरबार व पुणे आपण घ्यावेत, यासाठी राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे बीडमधील हेवीवेट नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. काका-पुतण्यांमधील या भांडणाची पक्षाने अद्यापर्यंत दखल घेतली नव्हती.

बीडमध्ये आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी संदीप यांच्यावर टाकून जयदत्त यांना धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे जयदत्त हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, राष्ट्रवादीने नुकतीच त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली. जयदत्त क्षीरसागर यांचा पत्ता कट करून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले त्यांचे पुतणे संदीप यांना लोकसभा तर बीडमधुन पुन्हा जयदत्त यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्‍चित केल्याचे बोलले जात आहे.

मागिल लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांना पक्षाला सोडचिठ्टी दिली होती. आता खोडके यांनी राष्ट्रवादीने पुन्हा प्रवेश केला आहे. अमरावती लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची माहीती पक्षातील एका नेत्याने दिली.

सतीश चव्हाण (जळगाव) हे आमदार झाल्यामुळे तर राजीव राजळे यांच्या निधनामुळे अहमदनगर मध्ये उमेदवार बदलले जातील. तसेच पुण्यातील लक्ष्मण जगताप (मावळ), कृष्णराव इंगळे (बुलडाणा), विजय भांबळे (परभणी) यांच्या जागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत