लोकसभेसाठी सेनेसोबत युती- शाह

भाजपा कडून शिवसेनेला गोंजरण्याचे प्रयत्न सुरूच

बंगळुरू : रायगड माझा 

विधान परिषद निवडणुकीत पडद्यामागे भाजपसोबत युती करतानाच शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन सातत्याने भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहील, असे स्पष्ट केल्याने नाराज शिवसेनेला पुन्हा गोंजारण्याचे काम भाजपचे नेते करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवरुन महाराष्ट्रात भाजप आणि सेनेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेचं हे वागणं बरं नव्हं’ अशा शब्दात कानपिचक्या देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात आता सेना आणि भाजप असा युतीतील मित्रपक्षांतच सामना रंगणार असताना दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शाहा मात्र सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न करीत असल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

भाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे नाराज शिवसेनेला गोंजारण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लोकसभा निवडणूक लढवतील, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तेलुगू देसम पक्ष स्वत:हून एनडीएतून बाहेर पडला. मात्र शिवसेना आमच्यासोबत कायम राहील. आम्ही पुढील निवडणूक एकत्र लढवू, असा विश्वास शाह यांनी कर्नाटकातील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

शाह यांना नाराज घटक पक्षांविषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी शिवसेना एनडीएमध्ये कायम राहील, असे सांगितले. ओदिशात भाजपा आणि बीजेडीमध्ये थेट लढत होईल. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर हल्ले केले जात आहेत. स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असे शाह यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. कर्नाटक निवडणुकीतील विजयाने भाजपासाठी दक्षिणेचे द्वार उघडेल. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे, असे शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर तोंडसुख घेतले. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही कामे केलेली नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजपचे सरकार आल्यास १० दिवसांमध्ये शेतक-यांचे १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, असेही शाह म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत