लोटे प्रदूषणप्रश्‍नी आमदार संजय कदमांचे उपोषण

खेड : रायगड माझा वृत्त 

लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणप्रश्‍नी आमदार संजय कदम यांनी बोलावलेल्या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे मंगळवारपासून (ता. २०) कदम यांनी सीईटीपीच्या गेटसमोर उपोषणाला सुरवात केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही ठिय्या दिला आहे.

लोटे वसाहतीतील कारखान्यातून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते व त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्‍यात आल्याचा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीतर्फे पंधरा ते वीस दिवसांपासून लोटे वसाहतीत प्रदूषणाच्या मुद्द्यावर वातावरण तापले आहे, तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गंभीर प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून भोई बांधवाच्या प्रश्‍नांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप कदम व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

उपोषणकर्ते आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी तसेच औद्योगिक वसाहतीचे अधिकारी यांची दोन वेळा चर्चा झाली. कदम व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापुढे जल, वायू प्रदूषण होणार नाही, रसायनमिश्रीत पाण्यामुळे दाभोळ खाडीपात्रातील माशांची मरतूक होणार नाही, असे पत्र दिल्यास उपोषण थांबवू, अन्यथा हे उपोषण सुरूच राहील.

उपोषणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष सतिश कदम, चिपळूणचे माजी पंचायत समिती सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद सदस्य बापू आंब्रे, पंचायत समिती सदस्य जीवन आंब्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे, जलाल राजपूरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत