वनअधिकाऱ्यांच्या अंगावर झाडांची राख, कुंड्या फेकून खासदार श्रीकांत शिंदेच आंदोलन

अंबरनाथ : रायगड माझा वृत्त

अंबरनाथमधील मांगरुळ गावातील टेकडीवरील झाडांना आग लागल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात कोपरीतील वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी वनअधिकाऱ्यांच्या अंगावर जळालेल्या झाडांची राख आणि कुंड्या फेकून आंदोलन केलं.

मांगरुळ गावाच्या टेकडीवरील झाडांना आग लावल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेने हा मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आंदोलकांनी झाडांची राख आणि कुंड्यांसह ठाण्याच्या कोपरीमधील वनविभागाच्या कार्यालयात धडक दिली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर राख टाकली आणि कुंड्या फेकल्या.

वनविभागाच्या संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांनाल निलंबित करावं, अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथच्या मांगरुळ परिसरात सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत खासदार श्रीकांत शिंदेंनी हजारो झाडं लावली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेली अनेक झाडं जगवण्यात वन विभागाला यश आलं होतं. यानंतर बुधवारी (14 नोव्हेंबर) रात्री पुन्हा एकदा याच झाडांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून लागवड केलेली 70 टक्के झाडं जळाली आहेत. या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो हातांची मेहनत वाया गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदेंनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत