वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बिबट्याचा बळी

इस्लामपूर : रायगड माझा ऑनलाईन 

येडेनिपाणी परिसरात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. वनविभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी लोकांनी वारंवार केली होती. मात्र  त्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले. या बिबट्याचा दोन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. वनविभागाने या बिबट्याला वेळीच जेरबंद करून जंगलात सोडले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.

येडेनिपाणी, इटकरे, गोटखिंडी, बावची, पोखर्णी या भागातील डोंगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून  सातत्याने लोकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. हा बिबट्या नागरी वस्तीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे जीवितहानी होेण्याचा धोकाही निर्माण झाला होता. लोकांनी वनविभागाशी संपर्क साधून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या परिसरात येऊन केवळ पाहणी केल्याचा फार्स केला. बिबट्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध होऊनही त्याला पकडण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. बिबट्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घ्यावी लागते. तसेच माणसावर त्याने हल्‍ला केला तरच त्याला पकडण्याचे अधिकार आहेत, अशी कारणे सांगून त्याला जेरबंद करण्याकडे कानाडोळा केला होता. एकीकडे बिबट्याचे या परिसरात सातत्याने दर्शन होत होते. त्यावर काहींचा विश्‍वासही बसत नव्हता. या केवळ अफवाच असल्याचे काहीजण म्हणत होते. मात्र दोन दिवसापूर्वी पुणे-बंगळूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने या परिसरात खरेच त्याचा वावर होता यावर शिक्कामोर्तब झाले. त्याला पकडण्याचा प्रयत्न वन विभागाने यापूर्वीच केला असता तर कदाचित त्याचे प्राणही वाचले असते, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

प्रत्यक्ष कामावर किती खर्च होतोे?

वन विभागावर शासन वर्षाला कोट्यवधींचा निधी खर्च करीत असते. यातील प्रत्यक्ष कामावर किती निधी खर्च होतो, हाही संशोधनाचा विषय आहे. या निधीतून वर्षाला वनीकरण केले जाते. मात्र वनीकरणात लावली जाणारी झाडे निसर्गाचा समतोल साधणारी नसतात. त्याचा प्राणी, पक्षांनाही काहीच उपयोग नसतो. वास्तविक वनविभागाने या निधीतून प्राण्यांच्या खाद्याचीही काही व्यवस्था करण्याची गरज आहे.

भक्ष्याचा शोधात बिबटे जंगलाबाहेर

मृत झालेला बिबट्या चांदोली जंगल परिसरातून भक्ष्याच्या शोधात या परिसरात आल्याची शक्यता आहे. या प्राण्यांची अन्नसाखळी मोडीत निघू लागल्याने हिंस्त्र प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. बिबट्याचे मुख्य खाद्य वानर, कुत्री, ससा हे प्राणी आहेत. या शिकारीच्या शोधातच बिबटे जंगलाबाहेर पडू लागले आहेत. शिकार मिळालीच नाही तर ते पाळीव प्राणी व वेळप्रसंगी माणसांच्यावरही हल्‍ले चढवू शकतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत