वरळीत दहीहंडी आयोजनावरुन आजी-माजी आमदार आमने-सामने

 

रायगड माझा वृत्त 

मुंबई: वरळीत दहीहंडी आयोजनाच्या ठिकाणावरुन आजी-माजी आमदारांमध्ये वाद झाला. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांच्यात जांभोरी मैदानात दहीहंडी आयोजन करण्यावरुन वाद सुरु झाला आहे.

गेल्या 15 वर्षांपासून वरळीतील जांभोरी मैदानात सचिन अहिर हे त्यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचे आयोजन करतात. यंदाही अहिर यांनीच जांभोरी मैदानात दहीहंडी आयोजनाच्या परवानगीसाठी सर्वप्रथम अर्ज केला होता. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

यंदा शिवसेनेने दादागिरी करत जांभोरी मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. यात आमदार सुनिल शिंदे यांना प्राधान्यक्रम देण्यात आला. तसेच, निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शिवसेनेने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

दरम्यान, दरवर्षी वरळीतील जांभोरी मैदानावर सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित होणारी दहीहंडी मुंबई-ठाण्यातील महत्त्वाची दहीहंडी मानली जाते. अनेक सेलिब्रिटी संकल्प प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत असतात. मात्र यंदा शिवसेनेने जांभोरी मैदानावर कब्जा मिळवल्याने संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला आपले ठिकाण बदलावे लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत