वाइनची ऑर्डर; मुंबईच्या प्राध्यापकाला फसवले

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

मुंबईतल्या माटुंगा येथील एका नामवंत महाविद्यालयातील ३८ वर्षाच्या प्राध्यापकाला वाइनची ऑर्डर देणं महागात पडलं. फोनवरून केलेल्या ऑर्डरमुळे त्याला तब्बल २४ हजारांचा चुना लावण्यात आला. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राध्यापकाने आपल्या शिपायाला फोनवरून वाइनची ऑर्डर करण्यास सांगितलं. शिपायाने गुगलवरून सर्च केलं आणि जवळच्याच वाइन शॉपचा फोन नंबर मिळवला. यानंतर शिपायाने वाइनची ऑर्डर देताना प्राध्यापकाच्या कार्डसंबंधीची सर्व माहिती दिली. तसंच वन-टाइम पासवर्ड(OTP) ही दिला. यामुळे काही मिनिटांत प्राध्यापकाच्या खात्यातून २४ हजार रुपये वळते करण्यात आले.

माटुंग्यातील रामनारायण रुइया महाविद्यालयात प्राध्यापक प्रशांत मसली हे जीवरसायन शास्त्र शिकवतात. ते बोरीवलीतील एमएचबी कॉलनीत राहतात. कामात व्यग्र असल्याने मसली यांनी शिपाई रूशाल राडे याला दारूच्या बाटलीची ऑर्डर करण्यास सांगितलं. यासाठी मसली यांनी शिपाई राडेकडे आपले क्रेडीट कार्ड आणि मोबाइल फोनही दिला. गुगलवरून शिपायाने बाबा वाइन शॉपचा फोन नंबर मिळवला आणि त्यावर फोन केला. वाइन शॉपच्या मालकाने फोन उचलल्यावर शिपाई राडे याने दारूच्या बाटलीची ऑर्डर केली. यावेळी दुकानदाराने ४२० रुपये देण्यास सांगितले. ऑनलाइन पे करणार असल्याचं सांगितल्यावर कार्डची सर्व माहिती शिपायाने दिली. तसंच OTPही दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुकानदाराने ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचं शिपायाला सांगत फोन ठेवून दिला. शिपायाने पुन्हा दुकानदाराला फोन केला. पुन्हा OTP सांगितला. या सर्व प्रक्रियेला जवळपास तासभर गेला. दुपारी ४.२२ ते ५.३५ पर्यंत फोनवरून ऑर्डरचा प्रयत्न सुरू होता. यादरम्यान मसली यांना आपल्या खात्यातून पैसे कापल्याचे सहा मेसेजेस आले. ४२०, ४४२०, ४४२०, ४४२०, ५००० आणि ५००० रुपये असे पैसे कापल्याचे सहा मेसेज मिळाले. यानंतर प्राध्यापक मसली यांना संशय आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली, असं पोलिसांनी सांगितलं.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी अनेक वाइन शॉपचे फोननंबर बदलले आहेत. या प्रकरणी बऱ्याच वाइन शॉप मालकांनी तक्रारीही केल्या आहेत. शिपाई राडे हा पण ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. बाबा वाइन शॉपच्या नावाने असलेल्या चुकीच्या नंबरवर त्याने फोन केला, असं पोलीस म्हणाले. यामुळे कुणालाही तुमचा OTP सांगू नका तसंच क्रेडीट किंवा डेबिट कार्डची संपूर्ण माहिती देऊ नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत