वाजपेयींचे निधन नक्की कधी झाले?, शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल

रायगड माझा वृत्त 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली होती, असा सवाल शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा येऊ नये, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयी यांनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली, असे शिवसेना नेते  राऊत यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून वाजपेयींच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने वाजपेयींच्या निधनाची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या लेखातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

आपल्या लेखात शिवसेना नेते राऊत म्हणतात, स्वराज्य म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले. पण त्यांची प्रकृती १२-१३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली).

दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी घुसलेले अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यश आले की समजावे, स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. या वेळीही परंपरेप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळून लावण्यासाठी दिल्लीत घुसलेल्या १० अतिरेक्यांना अटक झाली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा पकडला गेला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बेडरपणे स्वातंत्र्य दिन साजरा केला, असा टोला त्यांनी लगावला.

सध्या देशभरात सर्वत्र बंद, जाळपोळी सुरू आहेत. त्यात देशाची घटना जाळण्याचा प्रकार दिल्लीत घडला. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर संविधान जाळणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर झाले असते. पण ज्यांनी दिल्लीत अतिरेकी पकडल्याचा बनाव केला, त्यांच्या डोळय़ांसमोर डॉ. आंबेडकरांचे संविधान जाळले गेले. देशाचे स्वातंत्र्य कोणत्या वळणावर आहे याचे हे उदाहरण असल्याचे संजय राऊत म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत