वाजपेयींच्या अस्थी दर्शनावरून शिवसेनेची टीका!

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीदर्शनाच्या निमित्तानं सध्या देशभर भाजपकडून सुरू असलेल्या जाहीर कार्यक्रमांवर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘भाजपमध्ये बुजुर्ग नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही. पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे,’ असा खोचक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला आहे.

भाजपमध्ये बुजुर्गांच्या फक्त अस्थींना महत्त्व: उद्धव

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. वाजपेयींच्या अस्थींचं दर्शन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना करता यावं म्हणून भाजपकडून त्यांचा अस्थीकलश देशभरात फिरवला जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळं त्यातील गांभीर्य हरवून गेलं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते अस्थींकलशासोबत फोटो काढत असल्याचं प्रसारमाध्यमातून समोर आलंय. हाच धागा पकडून उद्धव यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ‘वाजपेयींच्या अस्थींचं हास्यास्पद राजकारण सुरू आहे. महान अटलजींना मृत्यूनंतर लहान करण्याचे प्रयोग सुरू आहेत,’ असा आरोप उद्धव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचीही प्रशंसा केली आहे.

काय म्हणतात उद्धव ठाकरे…

वाजपेयी हे अजातशत्रू होते. ते भाजपचे, संघ परिवाराचे नक्कीच होते. संपूर्ण देश त्यांचा होता व ते देशाचे होते. पण वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरण्याचे काम हास्यास्पद पद्धतीने सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशाचे जे हास्यास्पद राजकारण सुरू झाले आहे ते कोणालाच शोभणारे नाही.

माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते. आधी अंत्यसंस्कार मग त्या नेत्यांच्या अस्थिकलशांच्या उत्सवी मिरवणुका या एकवेळ मान्य केल्या तरी त्यांच्या विचारांचे काय? हेच प्रकार याआधी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतरही घडले आहेत.

अटलजींचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन ज्या गांभीर्याने तसेच श्रद्धेने व्हायला हवे होते तसे घडताना दिसले नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळता अस्थिकलश दर्शन व प्रदर्शन म्हणजे एक राजकीय रंगतदार कार्यक्रम साजरा करावा तसाच झाला. अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. जणू विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसू कसे शकतात? हे सर्व हास्यस्फोट कॅमेऱ्यात कैद झाले. काहींनी तर अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा ‘पराक्रम’ केला. तोदेखील कॅमेऱ्यात टिपला गेला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले.

वाजपेयींवर देशाने पंडित नेहरूंइतकेच प्रेम केले. त्यामुळे त्यांचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन एकपक्षीय न ठेवता सर्वपक्षीय म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून व्हायला हरकत नव्हती. सर्वच राजकीय पक्षांनी अटलजींचा अस्थिकलश स्वीकारून सन्मानाने आणि श्रद्धेने विसर्जित केला असता. पश्चिम बंगालात ममता, महाराष्ट्रात शिवसेना, ओडिशात नवीनबाबू, पंजाबात अकाली दल यांना सोबत घेता आले असते. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही सामील झाले असते व अटलजींच्या लोकमान्य महानतेचे विराट दर्शन जगाला घडले असते.

नेहरू व अटलबिहारी हे राजकीय कुंपणापलीकडचे नेते होते, पण राजकीय टिळेबाजी नेत्यांच्या अस्थिकलशावरही होते हे बरे नाही. अटलजींना निरोप देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज उपस्थित होते. तिथे फक्त संघ परिवार किंवा भाजपचेच लोक उपस्थित नव्हते. कारण अटलजी सर्वार्थाने महान होते. मात्र अशा या महान अटलजींना त्यांच्या मृत्यूनंतर लहान करण्याचे प्रयोग होत आहेत.

नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही. अटलजींच्या निधनानंतर देशात जी शोकलहर निर्माण झाली त्या लहरीचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत अटलजींच्या नातेवाईकांनीच व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले. असा हास्यप्रपंच पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत