वादग्रस्त जागेवर मंदिर व्हावं अशी श्रीरामाचीही इच्छा नसेल : दिग्विजय सिंह

रायगड माझा वृत्त : 

आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपावर टीका करताना, ‘वादग्रस्त जागेवर मंदिर उभारलं जावं अशी खुद्द प्रभू श्रीरामाचीही इच्छा नसेन’ असं दिग्विजय सिंह म्हणाले.

बुधवारी एका सभेत बोलताना सिंह म्हणाले, ‘किती विचित्र गोष्ट आहे…जेव्हा निवडणुका येतात त्याचवेळी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत येतो. राम मंदिर बनावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र, वादग्रस्त जागेवर मंदिर व्हावं अशी खुद्द प्रभू श्रीरामाचीही इच्छा नसेल असं दिग्विजय सिंह म्हणाले. ‘सरकार सांगतं न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात श्रीरामाची इच्छा असेन तर मंदिर नक्कीच उभारलं जाईन, तर राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश आणला जावा अशीही मागणी केली जाते…म्हणजे केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण व्हावा एवढीच या लोकांची इच्छा आहे’, अशी खरमरीत टीका सिंह यांनी भाजपावर केली.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नेमकं कोणत्या ठिकाणी सिंह यांनी हे विधान केलं याबाबत नेमकी माहिती नाही, मात्र बुधवारी मध्य प्रदेशमध्ये एका निवडणूक सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत