वादळ धडकणार नाही, पण मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, मुसळधार पावसाची शक्यता; महापालिका अॅालर्ट

हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असल्याचा इशारा दिल्याने महापालिकेने अ‍ॅलर्ट जारी केल्या आहेत. मुंबईला या वादळाचा धोका नसला तरी मुंबईत आज ताशी 50 किलोमीटर आणि उद्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मुंबईत जोरदार पावसाची शक्यता असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

पालिकेच्या स्तरावर करण्यात आलेली तयारी व सुसज्जता आणि इतर संबंधित यंत्रणांनी केलेली तयारी याचा आढावा मुंबई उपनगरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पोलीस दलाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी व केंद्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर भारतीय हवामान खाते, ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक’ (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, ‘बेस्ट’ सह विविध वीज वितरण कंपन्या, मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम. एम. आर. डी. ए.), मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचेही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत काय ठरलं?

>> बैठकीच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादळा बद्दल थोडक्यात माहिती दिली. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही. तथापि, ते मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. यानुसार 15 मे रोजी मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर रविवार, 16 मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच दिवशी काही ठिकाणी हा वेग ताशी 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल, अशीही माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली.

>> पालिका क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; काही ठिकाणी जोराचा पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आला आहे.

>> आज आणि उद्या या दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

>> मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच या अनुषंगाने मुंबई पोलीस व अग्निशमन दल यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

>> भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि पाण्याचा वेग लक्षात घेऊन वरळी – वांद्रे परिसराला जोडणाऱ्या राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतूक सुरु ठेवण्याचा अगर बंद करण्याचा निर्णय परिस्थितीसापेक्ष घेतला जाईल, असे मुंबई पोलीसांद्वारे सांगण्यात आले.

>> मुंबई परिसरात असणाऱ्या होर्डिंग पैकी जे होर्डिंग्ज धोकादायक परिस्थितीत आढळून येतील ते तातडीने हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

>> राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सुसज्ज असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत