वाशी पामबीच मार्गावरील इ टॉयलेट गेले चोरीला; शहरातील इतर इ टॉयलेट वापराविना झाले भंगार

वाशी,नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेने मोठ्या थाटा माथाट शहरात ६ शी टॉयलेट आणि २० इटॉयलेट उभारली, मात्र यातील वाशी पामबीच मार्गावरील गोकुळ डेअरी जवळील इ टॉयलेट चोरटयांनी वर्षभरापूर्वी उखडून नेल्याचा प्रकार घडला आला असून मनपा अधिकाऱ्यांनी रीतसर चोरीची तक्रार नोंदवून आपले कर्त्यव्य बजावल्याचे चित्र उभे केले आहे.

मात्र शहरातील उर्वरित जवळपास सर्वच इ टॉयलेट सध्या वापराविना भंगार अवस्थेत असल्याने आणि या टॉयलेटच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने इ टॉयलेट योजनेचा अवघ्या चार वर्षात फज्जा उडल्याचे दिसत असून या प्रकाराने मनपा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नवी मुंबई शहराला हागणदारी मुक्त करण्यासाठी व नैसर्गिक विधी करिता नागरिकांची गौरससोय होउ नये म्हणून शहरात मनपाच्या वतीने रस्त्याच्या कडेला आणि वर्दळीच्या ठिकाणी मोठया थाटामाटात २०१७ साली सुमारे २६ मोक्याच्या ठिकाणी इ टॉयलेट कार्यन्वयित केले, सुरुवातीला भांडवली खर्च वसूल करण्यासाठी सुटे नाणे टाकून वापरण्याची सुविधा या टॉयलेटमधे ठेवण्यात आली होती. मात्र चोरटयांनी सुटी नाणी चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने स्वयंचलित पद्धतीने वापराची सुविधा देण्यात आली. मात्र या अनुभवातून प्रशासन सुधारले नसल्याचा प्रत्यय आला आहे. पामबीच मार्गावर गोकुळ डेअरी समोर असलेले इ टॉयलेटच चक्क चोरून नेल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडे स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे यांनी पोलिसात तक्रार नोंदनून पालिकेचे कर्त्यव्य पार पाडले आहे. मात्र चोरीच्या या घटनेवर आता प्रशासनाने मौन बाळगून झाला प्रकार विसरली आहे. याबाबत मनसेच्या बाळासाहेब शिंदे, विनोद पार्टे आणि निलेश बाणखिले यांनी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांना निवेदन देऊन या प्रकाराचा जाब विचारला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता आयुक्त अभिजित बांगर प्रकरणी काय कारवाई करतात ? याकडे लक्ष लागले आहे.

यावर्षी मनपा प्रशासन स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर येण्याची धडपड करताना दिसते. मात्र यासाठी खर्च केलेल्या करोडो रुपयांचा कसा चुराडा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव इ टॉयलेटच्या निमित्ताने समोर आला आहे. अवघ्या चार वर्षात इ टॉयलेटची अवस्था भंगार झाल्याने जवळपास सगळे इ टॉयलेट धूळ खात पडले असून सध्या मनपा अधिकारी इ टॉयलेटचा पांढरा हत्ती पोसत असून यासाठी खर्च केलेले करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेले कंत्राटदार अचानक गायब झाल्याने या आलिशान इ टॉयलेटची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांना नैसर्गिक विधी पुन्हा रस्त्याच्या कडेला करण्याची नामुष्की पत्करावी लागत आहे. याबाबत उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याकडे विचारणा केली असता चोरीला गेलेल्या इ टॉयलेटची तक्रार नोंदवली असून बंद असलेल्या टॉयलेटबाबत मात्र मौन बाळगणे पसंत केले आहे. मनसेने देखील चोरीला गेलेल्या टॉयलेट बाबत पोलिसांकडे तक्रार देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली असून याबाबत लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .

महापालिका हद्दीत ई टॉयलेट, शी टॉयलेट अशा विविध उपक्रमांसाठी स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट असे प्रथम क्रमांकाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार  मनपाने पटकावले आहेत. मात्र या टॉयलेटच्या जीवावर पुरस्कारप्राप्त असलेल्या मनपाने याकडे कानाडोळा केला आहे. प्रदान करण्यात आले. शहरात २०१४ ते २०१७ या कालावधीत ९३ सार्वजनिक शौचालयं, तसंच आधुनिक पद्धतीची स्मार्ट २० ई टॉयलेट आणि महिलांसाठी स्पेशल ६ स्मार्ट शी टॉयलेट उभारणी करून देण्यात आली आहेत.  माजी महापौर सागर नाईक यांच्या काळात सुरुवातीला नऊ आणि त्यानंतर सीएसआरच्या माध्यमातून १६ ‘ई-शौचालये’ महापालिकेने सुरू केली. त्यासाठी तीन कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला.

‘इ टॉयलेटवर करोडो रुपये खर्च करून देखील त्या खर्चाच्या तुलनेत निगा राखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यांच्या मदतीने शहरात सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर आणि पामबीच मार्गावर २५ ई-शौचालये आणि फक्त महिलांसाठी सहा ‘शी-शौचालये’ उभारण्यात आली. परंतु ही सर्व शौचालये पाणी आणि वीज नसल्याने बंद पडली आहेत. हे एक शौचालय १४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आले आहे.

पामबीच मार्गावरील चोरीला गेलेल्या टॉयलेटची पोलीस दप्तरी अवघ्या ३५ हजाराची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली असून मनपाच्या वतीने तक्रार केली त्यावेळी या ठिकाणी शेड होती आता मात्र हे शेड देखील गायब झाले आहे. तरी देखील प्रशासन सध्या चोरीचा प्रकार म्हणून याकडे डोळेझाक करून याकडे दुर्लक्ष करत आहे , स्टेनलेस स्टील पासून तयार केलेल्या या टॉयलेटची किंमत पोलिसांकडे अवघी ३५ हजार रुपये दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडे याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. एक वर्ष उलटून देखील या चोरीचा तपास पुढे सरकलेला नाही .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत