वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द

मुंबई : रायगड माझा वृत्त 

देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या सूचना सर्व पोलिस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांकडून उपाययोजना आणि कारवाई केली जाते. तरीही वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश के. एम. राधाकृष्णन्‌ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय रस्तासुरक्षा समिती स्थापन केली. ही समिती देशभरातील यंत्रणेकडून अपघातांबाबत आढावा घेत असते. समितीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. बैठकीत वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली गेली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे प्रमाण कमी असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांचा वाहनपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील स्थिती
(गेल्या दहामहिन्यांतील) 

8792 – राज्यातील एकूण अपघात
9683 – राज्यातील एकूण बळी
2579 – राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात
2329 – राज्य महामार्गांवरील अपघात

2016मधील स्थिती
37886- अपघात
13682 – बळी

सर्वाधिक अपघात होणारे विभाग – औरंगाबाद, मुंबई, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, पालघर 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
– विजय पाटील, पोलिस उपायुक्त (मुख्यालय), महामार्ग पोलिस 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत