वाहतूक नियमभंग करणाऱ्या २७९ जणांच्या पारपत्रांना अटकाव

पुणे : रायगड माझा वृत्त 

वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना जरब बसण्यासाठी पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला असून १८८२ वाहनचालकांचा परवाना जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून २७९ जणांच्या पारपत्रांना अटकाव घालण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत. नियमभंग केल्यास केवळ दंडाची रक्कम भरून सुटण्याची भावना वाहनचालकांमध्ये असते. नियमभंग करणाऱ्या काही जणांनी पारपत्र कार्यालयाकडे पारपत्राबाबात अर्ज पाठविले आहेत.

पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पडताळणीत काही वाहनचालकांनी नियमभंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा वाहनचालकांची माहिती पारपत्र कार्यालयाला कळविण्यात आली आहे. त्यांना पारपत्र देण्यात येऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून १८८२ जणांचे परवाने जप्त करून ते रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी पुणे आणि पिंपरीतील वाहनचालकांची संख्या १५०३ आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. अशा २७९ जणांच्या पारपत्रांना अटकाव घालण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत