वाहने चोरी करून कटिंग करणाऱ्या टोळीचा पनवेल गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

पनवेल: साहिल रेळेकर

कटिंग केलेल्या अवस्थेतील ४० फुटी ट्रेलर व ईतर साहित्य हस्तगत

वाहने चोरी करून कटिंग करणाऱ्या टोळीचा पनवेल गुन्हे शाखा कक्ष-२ च्या ने पर्दाफाश केला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा कक्ष-२ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे व पोलीस नाईक प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी अनव्ये हैदर तजमुल अन्सारी (वय २४) यास कळंबोली मधील सेक्टर-१२ येथील महाराष्ट्र स्कूल जवळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर याबाबत सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्ह्यातील चोरी केलेला ४० फुटी ट्रेलर त्याने व त्याचा साथीदार मुर्तुजा उर्फ गबरू, मोराज, शाहिद व राजा यांच्यासह चोरी केला असून हाजी मलंग डोंगराच्या पायथ्याशी नेण्यात आला. त्यानंतर तेथील रिकाम्या जागेवर गॅस कटरच्या साहाय्याने कट करून ठेवला असून त्याचे पार्ट्स लॉकडाउन नंतर विक्री करणार असल्याचे कबूल केले. सदर प्रकरणी आरोपीला अटक करून गुन्ह्यातील ४० फुटी ट्रेलर कटिंग केलेल्या अवस्थेत पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून वहान चोरी चा अभिलेख, गुन्ह्यांची घटनास्थळे, तांत्रिक तपास याद्वारे करण्यात आला.

चोरी केलेले वाहन कटिंग करण्यासाठी लागणारे साहित्य, सिलिंडर व एक छोटा हत्ती (टेम्पो क्र. एम एच ४६ बीएम ४५८) मध्ये ठेवले असल्याचे आढळून आले. सदर टेम्पो बाबत चौकशी केली असता आरोपी राजा याने सदरचा टेम्पो कळंबोली येथून आणला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरचा टेम्पो देखील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेला असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी झालेली दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील ईतर आरोपींचा शोध गुन्हे शाखा कक्ष-२ मार्फत केला जात आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष-२ चे पोहवा प्रशांत काटकर, साळूंखे, पोना. प्रफुल्ल मोरे, प्रवीण भोपी,रुपेश पाटील, आदिनाथ फुदे यांनी विशेष प्रयत्न केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत