विजयी आघाडीसाठी “टीम इंडिया’ सज्ज!

इंग्लंडविरुद्ध दुसरा टी-20 सामना आज रंगणार

रायगड माझा वृत्त 

कार्डिफ: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात क्रिकेटच्या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करून संपूर्ण वर्चस्व गाजविताना एकतर्फी विजयाची नोंद केली. आज  होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही याच कामगिरीची पुनरावृत्ती करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. त्याच वेळी मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून प्रयत्न करेल.

इंग्लंडचा संघ एकदिवसीय विश्‍वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविला. त्यामुळे भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही इंग्लंड संघाकडून मोठ्या अपेक्षा होत. परंतु पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय संघासमोर इंग्लंडची दाणादाण उडाल्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांची पंचाईत झाली आहे. आता दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचे आव्हान इंग्लंडसमोर असून हा सामना गमावल्यास मालिकाही गमावण्याचा धोका त्यांच्यासमोर आहे.

पहिल्या सामन्यात जोस बटलर आणि जेसन रॉय या जोडीने केवळ 5 षटकांत 50 धावांची झंझावाती सलामी देताना इंग्लंडला वेगवान सुरुवात करून दिली होती. परंतु चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने केवळ दोन षटकांत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूला झुकविले. कुलदीपने पहिल्या षटकांत अलेक्‍स हेल्सला, तर पुढच्या षटकांत मॉर्गन, बेअरस्टो व जो रूट या खंद्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवीत इंग्लंडची अर्धी फलंदाजी कापून काडली. त्यानंतर भारताचा विजय ही केवळ औपचारिकताच उरली होती. कुलदीपने केवळ 24 धावांत 5 फलंदाज परतविताना इंग्लंडवर वर्चस्व गाजविले.

कुलदीपच्या फिरकीचे कोडे आपल्या फलंदाजांना सोडविता आले नसल्याची कबुली इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने दिली असली, तरी त्यामुळे त्यांच्यासमोरील समस्या सुटलेली नाही. अनेक वर्षांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये परतलेल्या उमेश यादवनेही जोशात मारा करताना दोन फलंदाज परतवीत यशस्वी पुनरागमन केले. भुवनेश्‍वर कुमारचे अपयश भारतासाठी चिंताजनक असले, तरी अन्य गोलंदाज त्याची भरपाई करण्यासाठी सज्ज असल्याने भारताच्या विजयी वाटचालीत त्यामुळे फरक पडू नये.

विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नसला, तरी पहिल्या सामन्यातील खेळीमुळे त्याला पुरेसा आत्मविश्‍वास मिळाला असणार. लोकेश राहुलला गवसलेला सूर भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा असल्या, तरी त्याची पूर्तता तो कशी करणार हे पाहावे लागेल. शिखर धवनकडून उद्या पहिल्या सामन्यातील अपयशाची भरपाई अपेक्षित आहे. तसेच सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या यांनाही टी-20 मासिका जिंकण्याबरोबरच आगामी एकदिवसीय मालिकेच्या दृष्टीने सराव करून घ्यावा लागेल.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युझवेंद्र चाहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, दीपक चाहर.

इंग्लंड – इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, टॉम करन, ऍलेक्‍स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली, डेव्हिड मेलन.
सामन्याची वेळ- रात्री 10-00 पासून.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत