‘विठ्ठल’च्या चेअरमनपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र News 24

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चेअरमन निवडीची प्रक्रिया कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चेअरमन निवडीच्या बैठकीसाठी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. चेअरमनपदी संचालक, स्व. आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ते कारखान्याच्या इतिहासातील सर्वार्ंत तरुण चेअरमन ठरले आहेत.

चेअरमन कोण होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सर्व संचालक मंडळाने भगीरथ भालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे चेअरमन पदासाठी केवळ भगीरथ भालके यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम. तांदळे यांनी जाहीर केले. यानंतर भगीरथ भालके यांनी स्व. आ. भारत भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तर कारखान्याचे संस्थापक औदुंबरअण्णा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे , व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, संचालक युवराज पाटील, समाधान काळे, गणेश पाटील, मोहन कोळेकर, विजयसिंह देशमुख, व्यंकट भालके, दशरथ खळगे, सूर्यकांत बागल तसेच सर्व संचालक मंडळ व विठ्ठल परिवाराचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

विठ्ठल कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कामगार, सभासद या सर्वांना विश्‍वासात घेऊन गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यात येईल. दररोजचे गाळप 4700 मेट्रिक टन आहे, ते सात हजारांवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने दाखविलेला विश्‍वास व स्व.आ. भारत नाना यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. – भगीरथ भालके

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत