विद्यार्थ्यांना टोकदार वस्तू टोचणारा मानसिक रुग्ण पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : रायगड माझा वृत्त 

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूल शाळेतील तीन लहान विद्यार्थ्यांना काही तरी धारदार पिनसारखी वस्तू टोचणार्‍या युवकाचे सीसीटीव्ही फुटेज ठाण्यात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी हे कृत्य करणार्‍या 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले.

पदवीधर असलेला हा युवक मानसिक आजाराने त्रस्त असून वडिलांनी ओरडल्यामुळे त्याने तीन-चार विद्यार्थ्यांना अशाप्रकारे टोकदार वस्तू टोचून पळ काढल्याची कबुली नौपाडा पोलिसांकडे दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली.

सोमवारपासून शाळेच्या आवारात तसेच, टेकडी बंगला भागात एक युवक काही शाळकरी मुलांना टाचणीने टोचून पळत असल्याचे प्रकार घडले होते. पालकांसमवेत असलेल्या मुलांनाही हा युवक टोचत असल्याने पालकांमध्ये रोष पसरला होता. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती. या टाचणी टोचल्याबाबतचे मेसेज सोशल मीडियामध्ये पसरल्याने शहरात अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र,याबाबत कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. तरीही नागरिकांमध्ये वाढणारा रोष लक्षात घेऊन नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून या युवकाला बुधवारी ताब्यात घेतले. तो एका व्यावसायिकाचा मुलगा असून वडील ओरडल्यामुळे त्याने असे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत