विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटींची बिनविरोध निवड

मुंबई : रायगड माझा वृत्त 

गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या विजय औटी यांनी बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी या पदासाठी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून विजय औटी यांनी अर्ज दाखल केला होता.  विरोधकांकडून या निवडणुकीसाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्षांचे उमेदवार म्हणून बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र या दोघांनी निवडणुकीपूर्वी आपले अर्ज मागे घेतल्याने औटी यांची बिनविरोध निवड झाली.ही निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी औटी यांचे अभिनंदन केले.

विधानसभेत विरोधकांच्या तुलनेत भाजपचे 123 आणि शिवसेनेचे 63 आमदारांचे संख्याबळ होते. विरोधकांपेक्षा तगडे संख्याबळ असल्याने विजय औटी यांचा विजय निश्चित मानला जात होता.  या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप बजावण्यात आला होता.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणं अपेक्षित होतं. आज, शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. हर्षवर्धन सकपाळ आणि बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्याने औटी यांचा एकट्याचाच अर्ज वैध आणि उरला होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत