विधान परिषद निकाल : भाजपा आणि शिवसेना दोन तर राष्ट्रवादी एका जागेवर विजयी!

रायगड माझा वृत्त |

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (गुरुवार) झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असून, कोकणातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र आहे.  उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

विधान परिषदेत प्रवेश करणारे नवनिर्वाचित आमदार 

 • कोकण : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी 
  रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी 314 मतांनी विजय मिळविला. अनिकेत तटकरे यांना 620 मते मिळाली, तर शिवसेनेच्या राजीव साबळे यांना 306 मते मिळाली. याठिकाणी नारायण राणे यांच्या स्वाभीमानी पक्षाने तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
 • परभणी :  विप्लव बजोरिया, शिवसेना 
  परभणी : परभणी – हिंगोली  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे विप्लव बाजोरिया हे 35 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांना या निवडणुकीत धक्कादायक पराभव तोंड द्यावे लागले आहे.
 • वर्धा-चंद्रपुर :  डॉ. रामदास आंबटकर, भाजप 
  वर्धा चंद्रपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रामदास आंबटकर हे विजयी झाले. त्यांना 528 मते मिळाली, तर विरोधातील काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना 491 मते मिळाली.
 • नाशिक : नरेंद्र दराडे, शिवसेना  
  नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 400 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मनसे जनता दल आघाडीचे ऍड शिवाजी सहाणे यांना 231 मते मिळाली. याठिकाणी भाजपने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही शिवसेनेने विजय मिळविला.
 • अमरावती :  प्रवीण पोटे, भाजप
  अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण पोटे यांचा 441 मतांनी विजय झाला. आश्चर्य म्हणजे काँग्रेसला केवळ 17 मते मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांकडूनही भाजपला मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत प्रवीण पोटे यांना 458 मते मिळाली, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत