विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, चार आंदोलक ताब्यात

मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज झाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला होता.

रायगड माझा वृत्त 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी काढण्यात आलेली संवाद यात्रा मुंबईत पोहोचली असतानाच विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणाऱ्या चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज झाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला होता. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची घोषणा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली होती. ही यात्रा सोमवारी विधान भवनावर धडकणार असून यात्रा मुंबईत पोहोचली आहे. दुसरीकडे विधान भवनावर काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणाऱ्या चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर संवाद यात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. या संवाद यात्रेमुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक राज्य शासन दोन दिवसांनंतर (दि.२८) विधानसभेत मांडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विधानपरिषदेतही मांडण्यात येणार आहे. आज (सोमवारी) सकाळी मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत