“विरोधी पक्षनेता हटाव’ची मागणी

रायगड माझा वृत्त 

 

पिंपरी – भटक्‍या कुत्र्यांवरुन महासभेत राष्ट्रवादी व भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाल्याने अवघ्या पाऊण तासात ही सभा सत्ताधारी भाजपला अक्षरश: गुंडाळावी लागली. विविध माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हकालपट्टीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढावली आहे.

भटकी कुत्री व डुकरांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महापालिका सभेच्या विषय पत्रिकेवर हा विषय नव्हता. मात्र, या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी कुत्र्याची काही पिले सभागृहात सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या विनंतीमुळे हे नियोजन बदलले. मात्र, त्यांच्या या नियोजनाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. साने यांनी सभेत बोलताना एक जातीवाचक आक्षेपार्ह विधान केले. त्यावरुन वाद चिघळल्याने सभा तहकूब करावी लागली.

हा वाद मिटल्यानंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या कार्यालयात भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत साने यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा पुरोगामी बुरखा जनतेसमोर आला असल्याची टीका केली. पवार म्हणाले की, साने यांनी केलेला शब्दप्रयोग हा सभागृहाच्या कामकाजातून हटविण्यात आला असला, तरीदेखील त्यांचे खरे जातीवादी रुप समजले आहे. भाजपने दोन मागासवर्गीय महिला पदाधिकाऱ्यांना स्थायी समिती अध्यक्षपदी संधी देत खऱ्या अर्थाने मागसवगीय समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे साने यांच्या या बेताल वक्तव्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत, त्यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याची आग्रही मागणी केली आहे.

त्यावर दत्ता साने यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. मी 96 कुळी शेतकरी असून असून जनावरे पाळण्याची आमची संस्कृती आहे. प्राण्यांकडे आम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही. उलट 96 कुळी या शब्दाचे राजकारण करुन भाजपा हीन राजकारण करत आहे. सीमा सावळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनाच्या निविदेमध्ये झालेल्या भष्ट्राचाराच्या चौकशी मागणी केली आहे. तसेच कचरा संकलन निविदा, 425 कोटींचे रस्ते विकास योजना, वारकऱ्यांसाठी ताडपत्री खरेदी, “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आदी प्रकरणांमधील गैरव्यवहार व भष्ट्राचाराबाबत सत्ताधाऱ्यांचे बुरखे फाडण्याचे काम केले आहे. हि भष्ट्राचाराची प्रकरणे पचविण्यासाठी सावळे यांचा थयथयाट चालू आहे, असे ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत